Father's Day 2026 : 'फादर्स डे' सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Father's Day 2026 : 'फादर्स डे' सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

वडिलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात 'फादर्स डे' साजरा केला जातो. पण हा दिवस नेमका कधी सुरू झाला, त्यामागचा इतिहास काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे, हे अनेकांना माहिती नसते.

किशोरी घायवट-उबाळे

आईप्रमाणेच कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या वडिलांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो. हा दिवस वडिलांनी कुटुंबासाठी केलेल्या त्याग, कष्ट आणि योगदानाची जाणीव करून देतो. मात्र, 'फादर्स डे'ची सुरुवात कशी झाली आणि तो सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला, याबाबत अनेकांना उत्सुकता असते.

'फादर्स डे'ची सुरुवात कशी झाली?

'फादर्स डे' साजरा करण्यामागे अमेरिकेतील सोनोरा स्मार्ट डॉड या महिलेची प्रेरणादायी कथा सांगितली जाते. सोनोराच्या आईचे निधन झाल्यानंतर तिच्या वडिलांनी विल्यम जॅक्सन स्मार्ट यांनी एकट्याने सहा मुलांचे संगोपन केले. वडिलांचे कष्ट आणि त्याग पाहून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक विशेष दिवस असावा, अशी कल्पना सोनोराने मांडली.

सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला?

जगातील पहिला अधिकृत 'फादर्स डे' १९ जून १९१० रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील स्पोकेन शहरात साजरा करण्यात आला. त्यानंतर हळूहळू या दिवसाची लोकप्रियता वाढत गेली आणि अनेक देशांनीही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

अधिकृत मान्यता कधी मिळाली?

अमेरिकेत १९७२ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' अधिकृतपणे साजरा करण्यास मान्यता दिली. त्यानंतर हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला.

'फादर्स डे' चे महत्त्व काय?

वडील हे कुटुंबाचे आधारस्तंभ मानले जातात. मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या भविष्यासाठी ते सातत्याने मेहनत घेत असतात. अनेकदा वडील आपल्या भावना व्यक्त करत नाहीत, मात्र त्यांच्या कृतीतून कुटुंबावरील प्रेम दिसून येते. अशा वडिलांप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'फादर्स डे' महत्त्वाचा मानला जातो.

भारतात 'फादर्स डे' कसा साजरा केला जातो?

भारतातही गेल्या काही वर्षांत 'फादर्स डे'चे महत्त्व वाढले आहे. या दिवशी अनेकजण आपल्या वडिलांना शुभेच्छा देतात, भेटवस्तू देतात किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवतात. सोशल मीडियावरही वडिलांसोबतचे फोटो आणि आठवणी शेअर करून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले जाते.

नात्यातील जिव्हाळा वाढवणारा दिवस

'फादर्स डे' हा केवळ एक दिवस नसून वडिलांनी केलेल्या त्यागाची आणि त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देणारा खास क्षण आहे. कुटुंबासाठी आयुष्यभर झटणाऱ्या वडिलांना धन्यवाद म्हणण्याची ही एक संधी मानली जाते.

Video : परभणीत भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या हनुमान मंदिराचे छत कोसळले; ५ भाविकांचा मृत्यू, १७ जण जखमी

केंद्राचा मोठा निर्णय! 'या' १६ औषधांवर देशभरात बंदी; अँटिबायोटिक आणि स्किनकेअर उत्पादनांना फटका

'पवनराजेंना कोणी मारलं?'; कोर्टाच्या निकालानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - निकाल धक्कादायक, उच्च न्यायालयात जाणार

फुकट्या प्रवाशांना चाप! विनातिकीट प्रवाशाला मोजावे लागणार दुप्पट पैसे; रेल्वेचा नवा नियम लागू

२० वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल; पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची निर्दोष सुटका