Cutlets From left over Chapati and Bhaji: रात्रीच्या जेवणातले अन्न राहिले की काय करावं समजत नाही. अन्न फेकून देणे हा पर्याय अजिबातच चांगला नाही. अशावेळी तुम्ही रात्रीच्या जेवणाच्या उरलेल्या चपात्या आणि भाजीपासून सकाळचा नाश्ता बनवू शकता. हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनतही करावी लागणार नाही. सकाळच्या घाईच्या वेळेत हा नाश्ता झटपट तयार होईल. तुम्ही उरलेल्या चपाती आणि भाजीपासून हेल्दी टेस्टी कटलेट बनवू शकता. चला या कटलेटची रेसिपी जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
उरलेल्या ४-५ चपाती, उरलेली भाजी, १ चमचा स्वीट कॉर्न (मॅश केलेले), ३-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १ चमचाआमचूर पावडर, २ सुक्या लाल मिरचीचे तुकडे, १ चमचा लिंबाचा रस, १ मोठी वाटी पोहे पावडर स्वरूपात, १/२ टीस्पून काळी मिरी पावडर, १/२ टीस्पून लाल मिरची पावडर, १ मोठी वाटी कॉर्न फ्लोअर, २ चमचे गाजर आणि बीन्स बारीक चिरून, चवीनुसार मीठ.
जाणून घ्या कृती
सर्व प्रथम उरलेल्या चपात्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात.
कढईत तेल गरम करा. त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.
नंतर बीन्स आणि गाजर घालून मंद आचेवर परतून घ्या आणि हलकेसे शिजू द्या.
थोडे मऊ झाल्यावर त्यात स्वीटकॉर्न आणि इतर भाज्या घाला.
भाज्यांमधील पाणी नीट सुकू द्या.
नंतर त्यात काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट घालून मिक्स करा.
आता हे मिश्रण बाहेर काढा आणि एका मोठ्या प्लेटमध्ये पसरवा.
या बनवलेल्या मिश्रणात पोहे बारीक करून त्याची पावडर बनवा.
मिश्रणापासून लहान कटलेट बनवा.
आता एका भांड्यात किंवा मोठ्या भांड्यात पाणी आणि कॉर्नफ्लोअर एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा.
तयार कटलेट्स त्यात बुडवून नंतर पोह्यांच्या पावडरमध्ये घाला.
तुम्ही ते तव्यावर शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. दोन्ही पद्धतीने बनवल्यास याची चव छान लागते.
चविष्ट कटलेट सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत. या कटलेट्सला हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.