Joint Pain : तरुण वयातच गुडघे दुखू लागलेत? चालताना येतोय 'कट-कट' आवाज; डॉक्टरांनी सांगितली कारणं आणि काळजी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Joint Pain : तरुण वयातच गुडघे दुखू लागलेत? चालताना येतोय 'कट-कट' आवाज; डॉक्टरांनी सांगितली कारणं आणि काळजी

तरुण वयात गुडघ्यातून कट-कट आवाज येतोय किंवा गुडघेदुखीचा त्रास जाणवतोय? क्रेपिटस म्हणजे काय, त्यामागील कारणं कोणती आणि गुडघ्यांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या.

Mayuri Gawade

गुडघ्यातून कट-कट असा आवाज येणं ही केवळ वयस्कर व्यक्तींची समस्या राहिलेली नाही. तरुण वयातही अनेकांना गुडघे वाकवताना, पायऱ्या चढताना-उतरताना किंवा बसून उठताना असा आवाज ऐकू येतो. वैद्यकीय भाषेत या आवाजाला 'क्रेपिटस' (Crepitus) असं म्हणतात. अनेकदा हा आवाज सामान्य कारणांमुळे येत असला, तरी काही वेळा त्यामागे गुडघ्यांशी संबंधित समस्या असू शकतात. त्यामुळे आवाजासोबत वेदना किंवा सूज जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट विभागाचे चेअरमन डॉ. अतुल मिश्रा यांनी कमी वयात गुडघ्यांतून आवाज येण्यामागील कारणं आणि घ्यायची काळजी याबाबत माहिती दिली आहे.

गुडघ्यातून कट-कट असा आवाज का येतो?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गुडघ्यातून आवाज येण्याचं एक सामान्य कारण म्हणजे सांध्यांमध्ये असलेल्या सायनोव्हियल फ्लुइडमध्ये (Synovial Fluid) गॅसचे बुडबुडे तयार होणं आणि ते फुटणं. हा द्रव सांध्यांना वंगण देण्याचं काम करतो. त्यामुळे हाडांमधील घर्षण कमी होण्यास मदत होते. याशिवाय गुडघ्याभोवती असलेले टेंडन्स आणि लिगामेंट्स हालचालीदरम्यान सरकल्यामुळे किंवा पुन्हा आपल्या जागी आल्यामुळेही असा आवाज ऐकू येऊ शकतो.

तरुण वयात गुडघ्यांतून आवाज येण्याची इतर कारणं कोणती?

कमी वयात गुडघ्यातून वारंवार आवाज येण्यामागे काही दैनंदिन सवयी आणि शारीरिक कारणंही असू शकतात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.

  • मांडीचे स्नायू कमजोर असणे.

  • दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणे.

  • शारीरिक हालचालींचा अभाव असणे.

  • शरीराचे वजन जास्त असणे.

  • चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे.

काही प्रकरणांमध्ये गुडघ्याच्या वाटीची हालचाल योग्य प्रकारे न होणे किंवा तिच्या आसपासच्या कार्टिलेजमध्ये बदल होणे यामुळेही गुडघ्यातून आवाज येऊ शकतो.

गुडघ्यातून आवाज येण्यासोबत वेदना होत असतील तर...

केवळ गुडघ्यातून कट-कट आवाज येणं म्हणजे नेहमीच गंभीर समस्या असते असं नाही. मात्र, या आवाजासोबत गुडघेदुखी, सूज, जडपणा किंवा चालताना त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी ऑस्टिओआर्थरायटिस, कार्टिलेजला झालेली दुखापत किंवा गुडघ्यांशी संबंधित इतर समस्यांची तपासणी करण्याची गरज असू शकते.

गुडघे निरोगी ठेवण्यासाठी 'या' गोष्टी करा

गुडघ्यांची ताकद टिकवण्यासाठी आणि त्यांच्याभोवतीचे स्नायू सक्षम ठेवण्यासाठी काही सवयी अंगीकारणं महत्त्वाचं आहे.

  • नियमितपणे हलका व्यायाम करा.

  • मांडी आणि गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत करणाऱ्या कसरती करा.

  • शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा.

  • दीर्घकाळ एकाच स्थितीत बसून राहणं टाळा.

  • व्यायाम करताना योग्य पद्धतीचा अवलंब करा.

गुडघ्यातून आवाज येत असल्यास लगेच घाबरण्याची गरज नाही. मात्र, त्यासोबत वेदना, सूज किंवा हालचाली करताना त्रास होत असेल तर ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती केवळ सर्वसाधारण माहितीसाठी आहे. वाचकांनी वैयक्तिक आरोग्यविषयक समस्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; नवशक्ती या माहितीच्या आधारे केलेल्या उपचारांची किंवा परिणामांची खात्री देत नाही.)

Pune : नशेच्या विळख्याला आता सरकारी घेराव! अमली पदार्थांविरोधात १९ सरकारी विभाग एकत्र येणार!

Mumbai : एसी बसची दिवाळी भेट; नव्या कोऱ्या ४८ बस प्रवासी सेवेत, ४१ आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

Amul Price Hike : दिवाळीच्या तोंडावर अमूलचे तूप-लोणी महागले; नवे दर किती?

दिवाळी बोनसवरून कर्मचारी आक्रमक! नवी मुंबईत ४५ हजार रुपये, पण ठाण्यात केवळ २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आंदोलनाचा इशारा

कार रिव्हर्स घेताना चाकाखाली चिरडून पत्नीचा करुण अंत; अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर