पावसाळ्यात पोटाचे संसर्ग टाळण्यासाठी 'या' चुका टाळा; तज्ज्ञ सांगतात... 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

पावसाळ्यात पोटाचे संसर्ग टाळण्यासाठी 'या' चुका टाळा; तज्ज्ञ सांगतात...

आरोग्य मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हेलन्स प्रोग्राम (IDSP) च्या आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ७० टक्के साथीचे आजार हे दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतात.

किशोरी घायवट-उबाळे

पावसाळ्यात मुसळधार पाऊस, साचलेले पाणी आणि वाढलेली आर्द्रता यामुळे पोटाच्या संसर्गजन्य आजारांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दूषित पाणी, अस्वच्छ अन्न आणि बदललेली दिनचर्या यामुळे जुलाब, अन्नविषबाधा, टायफॉईड, हिपॅटायटिस ए-ई यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या काळात पोटाची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यात पोटाचे आजार का वाढतात?

आरोग्य मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हेलन्स प्रोग्राम (IDSP) च्या आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ७० टक्के साथीचे आजार हे दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतात. पावसाळ्यात हे प्रमाण आणखी वाढते. आर्द्रता ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास सॅल्मोनेला आणि ई. कोलाईसारखे जीवाणू अन्नामध्ये झपाट्याने वाढतात. त्यामुळे पोटाच्या संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

'या' आजारांचे प्रमाण वाढते

मुंबईतील लिलावती रुग्णालयाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. समीर पारिख यांच्या मते, पावसाळ्यात टायफॉईड, जुलाब, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, कावीळ (हिपॅटायटिस ए आणि ई), लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढतात.

अनेक रुग्णांना तीव्र जुलाब, उलट्या आणि शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते. यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये संसर्गामुळे प्रकृती अधिक गंभीर होऊ शकते.

पावसाळ्यात काय खावे?

डॉक्टरांच्या मते, पावसाळ्यात शक्यतो घरचे, गरम आणि ताजे अन्नच खावे.

याशिवाय...

  • उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्या.

  • रस्त्यावरील कापलेली फळे, उघडे ज्यूस आणि कच्चे सॅलड टाळा.

  • शिळे अन्न खाणे टाळा.

  • अन्न नेहमी झाकून ठेवा.

दही आणि ताक ठरते फायदेशीर

डॉ. पारिख यांच्या मते, ताजे दही आणि ताकामध्ये लॅक्टोबॅसिलससारखे चांगले जीवाणू असतात. त्यामुळे पचन सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

उकडलेली अंडी आणि पाश्चराइज्ड दूध सुरक्षित असले तरी ज्यांना गॅसचा त्रास असतो त्यांनी सफरचंद आणि नाशपातीसारखी फ्रुक्टोजयुक्त फळे कमी खावीत.

जेवताना अन्न नीट चावून खाल्ल्यास अपचन आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होतो.

जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची

झायनोव्हा शाल्बी रुग्णालयाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. ऋषिकेश मालोकर यांच्या मते, पावसाळ्यात लोक कमी चालतात, व्यायाम कमी करतात आणि तळलेले किंवा मसालेदार पदार्थ अधिक खातात. त्यामुळे पोटातील चांगल्या जीवाणूंचा समतोल बिघडतो. यामुळे ॲसिडिटी, गॅस, पोट फुगणे, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या वाढू शकतात.

तणाव आणि झोपेचाही परिणाम

तणाव आणि अपुरी झोप याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे पचन मंदावते आणि ॲसिडिटी, गॅस तसेच पोटदुखीचा त्रास वाढू शकतो.

डॉक्टरांचा सल्ला असा आहे की...

  • दररोज ७ ते ८ तास झोप घ्या.

  • नियमित चालणे, योग आणि ध्यान करा.

  • रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी करा.

  • रात्री हलके आणि ताजे अन्न खा.

  • जेवल्यानंतर काही वेळ चालण्याची सवय लावा.

  • पुरेसे पाणी प्या.

ही लक्षणे दिसल्यास घरगुती उपायांवर विसंबू नका

तज्ज्ञांच्या मते, खालील लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा...

  • ताप

  • पोट खूप फुगणे

  • शौचातून रक्त येणे

  • सतत उलट्या किंवा जुलाब

  • तीव्र पोटदुखी

अशा वेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

Mumbai Property Tax : मालमत्ता कराचे बिल आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर; BMC ची नवी डिजिटल सेवा लवकरच सुरू

वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, VIDEO