पावसाळा सुरू झाला की बाजारात विविध रानभाज्यांची रेलचेल पाहायला मिळते. या हंगामी भाज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे करटोली. बाहेरून काटेरी दिसणारी ही भाजी आतून मऊ, चविष्ट आणि पौष्टिक असते. आयुर्वेदातही करटोलीला महत्त्वाचे स्थान असून, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचन सुधारण्यास मदत करणे आणि शरीराला आवश्यक पोषक घटक देण्यासाठी तिचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊया करटोलीचे फायदे आणि पारंपरिक पद्धतीने बनवण्याची सोपी रेसिपी.
करटोली खाण्याचे फायदे
करटोलीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर आणि शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आढळतात. त्यामुळे पावसाळ्यात संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरू शकते.
याशिवाय पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास आणि शरीराला हलका व पौष्टिक आहार मिळवून देण्यास करटोली मदत करू शकते. पारंपरिक आहारातही या भाजीला विशेष महत्त्व दिले जाते.
करटोलीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य
करटोली
कांदा
हिरव्या मिरच्या
लसूण
मोहरी
जिरे
हिंग
कढीपत्ता
हळद
लाल तिखट
मीठ
कोथिंबीर
लिंबाचा रस
तेल
करटोलीची भाजी बनवण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम करटोली स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. त्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे काप करा. इच्छेनुसार आतील बिया काढू शकता.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण घालून फोडणी द्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंग येईपर्यंत परता.
आता त्यात हळद, लाल तिखट आणि मीठ घालून करटोली मिसळा. झाकण ठेवून मंद आचेवर साधारण ५ ते ८ मिनिटे शिजू द्या. भाजी शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून हलकेच मिसळा.
गरमागरम भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा पोळीबरोबर ही पारंपरिक करटोलीची भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.