ऑफिसचा ताण ठरतोय मायग्रेनचे कारण? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

ऑफिसचा ताण ठरतोय मायग्रेनचे कारण? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मायग्रेन हा केवळ डोकेदुखीचा त्रास नसून एक न्यूरोलॉजिकल विकार आहे. आजच्या जीवनशैलीमुळे त्याचा धोका वाढत आहे.

Krantee V. Kale

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वारंवार होणाऱ्या डोकेदुखीकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र, सततचा ताण, अपुरी झोप, वेळेवर जेवण न करणे आणि स्क्रीनसमोर बराच वेळ काम करणे यामुळे साधी डोकेदुखी नव्हे, तर मायग्रेनचा त्रासही होऊ शकतो, असा इशारा सैफी रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. फुरकान खान यांनी दिला आहे. काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मायग्रेनचे प्रमाण वाढत असून, त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कामाची बदलती पद्धत ठरतेय मायग्रेनचे कारण

डॉ. खान यांच्या मते, मायग्रेन हा केवळ डोकेदुखीचा त्रास नसून एक न्यूरोलॉजिकल विकार आहे. आजच्या जीवनशैलीमुळे त्याचा धोका वाढत आहे. दीर्घकाळ कम्प्युटर स्क्रीनसमोर काम करणे, मानसिक ताण, वेळेवर जेवण न करणे, शरीरात पाण्याची कमतरता, चुकीच्या पद्धतीने बसणे आणि कॅफिनयुक्त पेयांचे जास्त सेवन ही मायग्रेनची प्रमुख कारणे ठरू शकतात.

हायब्रिड आणि 'वर्क फ्रॉम होम' पद्धतीमुळे अनेक कर्मचारी पूर्वीपेक्षा अधिक वेळ काम करत आहेत. विश्रांतीचा अभाव आणि सततचा ताण यामुळे काम करणाऱ्या वयोगटात मायग्रेनचे प्रमाण वाढत असल्याचे ते सांगतात.

ताण आणि अपुरी झोप ठरते मोठा धोका

मानसिक ताण हा मायग्रेनचा सर्वात मोठा ट्रिगर मानला जातो. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने मेंदूमधील वेदनांशी संबंधित भाग अधिक संवेदनशील होतात.

याशिवाय अनियमित झोप, रात्री उशिरापर्यंत जागरण, अपुरी किंवा निकृष्ट दर्जाची झोप यामुळेही मायग्रेनचा धोका वाढतो. काही व्यक्तींमध्ये कमी किंवा जास्त झोपेमुळेही मायग्रेनचा झटका येऊ शकतो.

स्क्रीनमुळे थेट मायग्रेन होतो का?

मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनमुळे थेट मायग्रेन होत नाही, असे डॉ. खान स्पष्ट करतात. मात्र, दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहणे, स्क्रीनचा जास्त प्रकाश, चुकीची बसण्याची पद्धत आणि डोळे कमी वेळा मिचकावल्यामुळे 'डिजिटल आय स्ट्रेन' निर्माण होतो. त्यामुळे डोकेदुखी वाढू शकते आणि ज्यांना मायग्रेनची प्रवृत्ती आहे, त्यांच्यात झटका येऊ शकतो.

त्यामुळे स्क्रीनची ब्राइटनेस योग्य ठेवणे, नियमित ब्रेक घेणे आणि २०-२०-२० नियम पाळण्याचा सल्ला ते देतात. (दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट अंतरावरील वस्तूकडे पाहणे.)

वेदनाशामक औषधांचा अतिरेक टाळा

वारंवार डोकेदुखी होत असल्यास अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेतात. मात्र, महिन्यात १० ते १५ दिवसांपेक्षा जास्त अशा औषधांचा वापर केल्यास 'मेडिकेशन ओव्हरयूज हेडेक'चा धोका वाढतो. त्यामुळे डोकेदुखी कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकते.

मायग्रेन म्हणजे केवळ डोकेदुखी नाही

मायग्रेनमुळे तीव्र ठणकणारी डोकेदुखी, मळमळ, उलट्या, प्रकाश आणि आवाजाची संवेदनशीलता तसेच काही रुग्णांमध्ये डोळ्यांसमोर चमकणारे प्रकाश किंवा दृष्टीत बदल (ऑरा) अशी लक्षणे दिसू शकतात.

ही लक्षणे काही तासांपासून अनेक दिवस टिकू शकतात. त्यामुळे व्यक्तीची एकाग्रता, कामाची क्षमता आणि दैनंदिन जीवनमान यावर परिणाम होतो.

मायग्रेन टाळण्यासाठी काय करावे?

डॉ. खान यांच्या मते, औषधांबरोबरच जीवनशैलीत बदल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • दररोज ठरावीक वेळेत झोपणे आणि उठणे

  • पुरेसे पाणी पिणे

  • वेळेवर जेवण करणे

  • नियमित व्यायाम करणे

  • योग, ध्यानाचा सराव करणे

  • कॅफिनयुक्त पेयांचे प्रमाण मर्यादित ठेवणे

  • २०-२०-२० नियम पाळणे आणि योग्य पद्धतीने बसून काम करणे

न्यूरोलॉजिस्टचा सल्ला कधी घ्यावा?

महिन्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा डोकेदुखी होत असल्यास, मायग्रेनचा त्रास तीव्र असल्यास किंवा डोकेदुखीसोबत हात-पायात अशक्तपणा, बधिरपणा, दृष्टीत बदल किंवा बोलण्यात अडचण जाणवत असल्यास तातडीने न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा, असे डॉ. खान सांगतात.

त्यांच्या मते, मायग्रेनचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास झटक्यांची तीव्रता व वारंवारता कमी करता येते. त्यामुळे जीवनमान सुधारू शकते.


(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

खर्चात मोठी वाढ; मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ५.४ लाख कोटींची भर

मुंबई-गोवा महामार्गाला ग्रामस्थांकडून हिरवाईची भेट; तळेकांटे ग्रामस्थ लावणार दोन हजार झाडे

भारतात ४८ अब्ज डॉलर गुंतवणुकीची ॲमेझॉनची घोषणा; सीईओ अँडी जॅसी यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

Badlapur : प्राजक्ता मेहेर यांची हत्या केल्याचे स्पष्ट; फॉरेन्सिक अहवालातून हत्येचा उलगडा