रवींद्र राऊळ/मुंबई
ज्या सायबर गुन्ह्यात खऱ्याखुऱ्या क्यूआर कोडसारखे दिसणारे बनावट क्यूआर कोडसमोर करत टोपी घातली जाते त्याला क्विशिंग म्हणतात. हे बनावट क्यूआर कोड तुम्हाला अशा फसव्या वेबसाइटवर घेऊन जातो जिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स वा इतर संवेदनशील माहिती विचारली जाते किंवा तुमच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर अथवा धोकादायक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याचा प्रकार केला जातो. असे क्यूआर कोड स्कॅन करताच तुमचा सगळा डेटा चोरीला जाऊ शकतो.
हायवेवरील टपरीवर चहा प्यायल्यानंतर महेश भारांबे यांनी रोख पैसे देण्याऐवजी चहावाल्याकडचा क्यूआर कोड स्कॅन केला पण घरी पोहाचेपर्यंत त्यांचे बँक खाते रिकामे झाले होते. सध्याच्या काळात पावलापावलावर पेमेंट करताना अथवा मेन्यू निवडताना सगळेच क्यूआर कोड वापरतो. पण कधीतरी हे आपल्याला अतिशय महागात पडू शकते. कारण मूळ कोडवर बनावट कोड लावले तर ते ओळखणार तरी कसे? कधी कुठली सवलत अथवा विशेष ऑफर देण्याच्या बहाण्याने तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडले जाऊ शकते. अलीकडे असे क्विशिंग स्कॅम्स मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. कारण यात आपली फसवणूक झाली असा संशयही कुणाला येत नाही आणि लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. अनेकदा युजर्सला ते युपीआय असल्याचे वाटते आणि ते यूपीआय पिन देतात. लागलीच त्यांचे बँकखाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे कुठलाही क्यूआर कोड स्कॅन करताना मोजून किमान तीनवेळा तरी विचार करा.
सोशल मिडियावरही कोणी क्यूआर कोड दाखवला तरी सावध. तो स्कॅन करताच तुम्हाला फ्रॉड कॉल, स्कॅंमशी संबंधित मेसेज वगैरे येऊ शकतात. म्हणूनच सोशल मीडियावर असा क्यूआर कोड दिसला तर आधी त्याची माहिती घ्या. जर काही संशय येत असेल तर ताबडतोब त्यातून बाहेत पडा. नाहीतर तुमची कुंडली आणि सोबत जमापुंजी स्कॅमरच्या हाती गेलीच समजा. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती, बँकिंग किंवा इतर माहिती विचारली तर थांबा आणि आधी त्याची वैधता तपासा.