काही फळभाज्या या निसर्गाने दिलेले वरदान आहे. या भाज्या बारमाही उपलब्ध असतात. तसेच आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. दोडका ही एक फळभाजी आहे. दोडक्याचा आहारात नियमित समावेश केल्यास अनेक आजार लांब पळतात. जाणून घ्या दोडक्याबाबत अधिक माहिती.
दोडका रानभाजी
सुरुवाती दोडका ही रानभाजी होती. रानावनात वेलीवर हा दोडका मिळायचा. याची चव कडवट असायची. याच्या बियांचा उपयोग खोकला, कफ, आम्लपित्त पोटदुखी, पोटफुगी इत्यादी आजारांमध्ये केला जायचा.
सामान्य किंवा गोड दोडका
आता बाजारात उपलब्ध असणारा दोडका हा चवीला सामान्य (किंचित) गोड असतो. याचे गुणधर्मही वेगळे असतात. बाजारात बारमाही उपलब्ध असणारा हा दोडका देखील आरोग्यासाठी फारच उत्तम असतो.
असा करा आहारात समावेश
दोडक्याची भाजी झटपट होते. तसेच दोडक्याच्या शिरांची देखील भाजी तयार केली जाते. त्याला अनेक ठिकाणी खरडा, असे म्हणतात. ही भाजी देखील आरोग्यासाठी हितकर असते. दोडक्याची भाजी शेंगदाण्याचा कूट घालूनही करता येते.
दोडक्याचे उपयोग
मधुमेह असेल तर दोडका हा दुधी भोपळ्याप्रमाणे उकडून खावा.
मलावरोध, खडा होणे, पोट फुगी, थकवा येणे, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे, पाय दुखणे या विकारांमध्ये दोडक्याची भाजी किंवा दोडक्याचा रस फायदेशीर ठरतो.
मूतखड्याचा त्रास असेल तर दोडक्याचा मुळांचा आहारात समावेश करा. यामुळे निश्चित आराम मिळतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)