भारतीय परंपरेत तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिणे हे एक शाश्वत आरोग्याचे मार्ग मानले गेले आहेत. आयुर्वेदानुसार तसेच आधुनिक संशोधनानुसार, तांब्याचे काही खास गुणधर्म आहेत; अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी. या गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पचनक्रिया सुधारते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिल्याने गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अशक्तपणा आणि संधिवातासारख्या समस्यांवर आराम मिळतो. शरीरातील लोहाचे शोषण सुधारते, ज्यामुळे कमकुवतपणा कमी होतो. तसेच दाहक विरोधी प्रभावांमुळे संधिवातामुळे होणारी वेदना आणि सूज कमी होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास थायरॉईडचे संतुलन राखण्यास मदत होते, चयापचय सुधारतो आणि हार्मोनल असंतुलन कमी होते.
हे पाणी प्रत्येकासाठी लाभदायी नसते. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी, अतिसार, उलट्या, गॅस, तीव्र रक्तस्त्राव किंवा छातीत जळजळ असलेल्या लोकांनी तांब्याचे पाणी टाळावे. विल्सन आजार किंवा शरीरात आधीच जास्त तांबे असलेल्यांनी देखील हे पाणी पिऊ नये.
तांब्याच्या भांड्यात पाणी जास्त वेळ ठेवणे किंवा जास्त प्रमाणात पिणे विषबाधीचा धोका निर्माण करू शकते. मळमळ, उलट्या, पोटदुखी, अतिसार यासह यकृत आणि मूत्रपिंडाचे नुकसान होण्याची शक्यता असते. लिंबू, दही किंवा इतर आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवू नयेत, कारण त्यामुळे हानिकारक प्रतिक्रिया होऊ शकतात. उन्हाळ्याच्या काळात किंवा जीर्ण भांड्यांमध्ये तांब्याचा वापर टाळणे श्रेयस्कर आहे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी ही प्राचीन आरोग्याची पद्धत योग्य प्रकारे वापरली तर फायदेशीर ठरते, पण जास्त प्रमाणात किंवा योग्य काळजी न घेता पिल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)