आपण रोज सकाळ-संध्याकाळ टूथब्रश वापरतो, पण कित्येक लोक एकाच टूथब्रशचा वापर महिनोनमहिने करत राहतात? काही वेळा मित्राचा किंवा कुटुंबातील सदस्याचा ब्रशसुद्धा वापरतात. पण हीच हलगर्जी पुढे हृदयरोग आणि डायबिटीजसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते, असं HT Lifestyle ला दिलेल्या मुलाखतीत क्लोव्ह डेंटलचे चीफ क्लिनिकल ऑफिसर ले. जन. (निवृत्त) डॉ. विमल अरोरा यांनी सांगितलं.
डॉ. अरोरा म्हणतात, "टूथब्रश हे शरीराचं पहिलं सुरक्षाकवच आहे. रोज ब्रश केल्याने तोंडातील जीवाणूंची साखळी तुटते, जी शांतपणे हृदयापर्यंत किंवा पचनसंस्थेपर्यंत जाऊ शकते."
तोंड आणि डायबिटीज यांचा संबंध
डॉ. अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या तोंडात ७०० हून अधिक प्रकारचे जीवाणू असतात. ब्रश न केल्यास हे जीवाणू वाढतात, गम लाईनवर चिकटतात आणि ‘प्लाक’ तयार करतात. याच प्लाकमधून सूज आणि संसर्ग सुरू होतो.
ते पुढे म्हणाले, "जेव्हा हे जीवाणू आणि सूज निर्माण करणारे घटक रक्तप्रवाहात प्रवेश करतात, तेव्हा ते हृदय, यकृत आणि स्वादुपिंडापर्यंत पोहोचतात आणि शरीरात सतत सूज निर्माण करतात."
या संसर्गामुळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्याची क्षमता कमी होते, आणि उलट जास्त ब्लड शुगरमुळे गम इन्फेक्शन वाढतात. हे एकमेकांवर परिणाम करणारे चक्र आहे. जे आपण फक्त दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवून तोडू शकतो, असं डॉ. अरोरा म्हणतात.
हृदयरोगाचा धोका का वाढतो?
"हिरड्यांची दीर्घकालीन सूज म्हणजेच क्रॉनिक गम इन्फ्लमेशन केवळ रक्तस्त्राव करणाऱ्या हिरड्यांपुरती मर्यादित राहत नाही, ती पुढे जाऊन धमन्यांना कठीण आणि अरुंद बनवते. या स्थितीला ‘अथेरोस्क्लेरोसिस’ म्हणतात," असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.
'जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन'च्या माहितीनुसार, अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे धमन्यांच्या आतील थरात चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर घटक साचल्याने त्या अरुंद व कडक होतात.
डॉ. अरोरा म्हणतात, "ज्यांना गम डिसीज आहे, त्यांना कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजचा धोका जवळपास दुप्पट असतो."
सतत चालणारी सूज ही हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करते आणि दीर्घकाळाने हृदयरोगाचा धोका वाढवते.
तुम्ही काय करू शकता?
डॉ. अरोरा यांचा सल्ला:
दिवसातून दोन वेळा ब्रश करा
दररोज फ्लॉसिंग करा
संतुलित आहार घ्या
आणि दर काही महिन्यांनी दंतचिकित्सकाकडे तपासणीसाठी जा
टूथब्रश किती वेळाने बदलावा?
“दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलणं आवश्यक आहे,” असा स्पष्ट सल्ला डॉ. अरोरा देतात.
कारण -
जुना ब्रश जीवाणू साठवतो,
ब्रशचे ब्रिसल्स झिजतात,
त्यामुळे तो दातांच्या फटींमध्ये नीट पोहोचू शकत नाही,
आणि त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)