WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

WhatsApp Scheduled Messages : व्हॉट्सॲपने निवडक अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यांसाठी मेसेज शेड्यूल करण्याची सुविधा सुरू केली आहे. आता मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याची वेळ आधीच ठरवता येणार. जाणून घ्या नवं फीचर कसं काम करतं.

Mayuri Gawade

व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एखाद्याला ठरावीक वेळी मेसेज पाठवायचा असेल, तर त्यासाठी फोन हातात घेऊन बसण्याची गरज भासणार नाही. व्हॉट्सॲपवर मेसेज आधीच लिहून तो कधी पाठवायचा, याची वेळ ठरवता येणार आहे. कंपनीने या नव्या सुविधेची चाचणी सुरू केली असून, सध्या निवडक अँड्रॉइड वापरकर्त्यांना हे फीचर उपलब्ध करून दिलं जात आहे.

नेमकं काय आहे नवं फीचर?

व्हॉट्सॲपच्या नव्या फीचरमुळे वापरकर्त्यांना मेसेज आधीच तयार करून ठेवता येणार आहे. त्यानंतर तो मेसेज कोणत्या दिवशी आणि किती वाजता पाठवायचा, हे ठरवता येईल. विशेष म्हणजे, मेसेज तयार केल्यानंतर १० मिनिटांपासून ते २ आठवड्यांपर्यंतची वेळ निवडता येणार आहे. निवडलेल्या वेळी मेसेज आपोआप पाठवला जाईल. व्हॉट्सॲपच्या नव्या सुविधांची माहिती देणाऱ्या 'WABetaInfo' या संकेतस्थळाने याबाबत माहिती दिली आहे.

फोन ऑफलाइन असला तरी मेसेज जाणार

या फीचरचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मेसेज पाठवण्यासाठी त्या वेळी व्हॉट्सॲप सुरू असण्याची गरज नाही. तुम्ही ॲप बंद केलं किंवा तुमचा फोन इंटरनेटशी जोडलेला नसला, तरी ठरलेल्या वेळी मेसेज आपोआप पाठवला जाईल, असं WABetaInfo ने म्हटलं आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा, एखाद्या महत्त्वाच्या कामाची आठवण किंवा ठरावीक वेळी पाठवायचा मेसेज यासाठी ही सुविधा उपयोगी ठरू शकते.

व्हॉट्सॲपवर मेसेज शेड्यूल कसा करायचा?

मिळालेल्या माहितीनुसार, ही सुविधा वापरण्याची पद्धत सोपी असणार आहे.

१. सर्वप्रथम व्हॉट्सॲपवर संबंधित व्यक्तीचं चॅट उघडा.

२. तुम्हाला पाठवायचा असलेला मेसेज लिहा.

३. त्यानंतर मेसेज सेंड बटणावर काही वेळ बोट दाबून ठेवा.

४. स्क्रीनवर मेसेज पाठवण्यासाठी तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय दिसेल.

५. तुम्हाला हवी असलेली वेळ निवडल्यानंतर मेसेज शेड्यूल होईल.

६. ठरलेल्या वेळी हा मेसेज आपोआप संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचेल.

फोटो आणि व्हिडीओही पाठवता येणार

केवळ मजकूरच नाही, तर फोटो, व्हिडीओ, लिंक आणि कागदपत्रंही ठरावीक वेळी पाठवता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही सुविधा ग्रुप चॅटमध्येही वापरता येण्याची शक्यता आहे.

मात्र, सध्याच्या चाचणीत गॅलरीमधून एकावेळी एकच फोटो किंवा व्हिडीओ शेड्यूल करता येणार आहे. अनेक फोटो किंवा व्हिडीओ एकत्र निवडून शेड्यूल करण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही.

शेड्यूल केलेला मेसेज रद्द करता येणार का?

व्हॉट्सॲपमध्ये 'Scheduled Messages' नावाचा स्वतंत्र पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे. या पर्यायातून आधीच शेड्यूल केलेले मेसेज पाहता किंवा हटवता येतील.

मेसेज पाठवण्याची वेळ येण्यापूर्वी तो हटवला, तर समोरच्या व्यक्तीला त्याबाबत कोणतीही सूचना मिळणार नाही.

ग्रुपमध्ये शेड्यूल केलेले मेसेज त्या वेळी ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांनाच दिसतील. त्यानंतर ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या नव्या सदस्यांना ते मेसेज दिसणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली आहे.

सर्वांना कधी मिळणार ही सुविधा?

सध्या हे फीचर अँड्रॉइडच्या २.२६.४०.७ बीटा व्हर्जनमधील निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिलं जात आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या व्हॉट्सॲपवर लगेच हा पर्याय दिसेलच असं नाही.

येत्या काही आठवड्यांत अधिक वापरकर्त्यांना ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी ती नेमकी कधी सुरू होईल, याबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नाही.

ज्यांच्या व्हॉट्सॲपवर हे फीचर आलेलं नाही, त्यांनाही इतरांनी शेड्यूल करून पाठवलेले मेसेज नेहमीप्रमाणे मिळू शकतील.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Madhu Kambikar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

मस्कच्या मक्तेदारीला भारताने आव्हान द्यावे; नीती आयोग माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांची सूचना

­सत्तेत एकत्र, पण कारभारावरून संघर्ष! पाणीपुरवठा प्रकरणावरून सावंतवाडी नगरपरिषदेत भाजप-शिंदे सेना आमनेसामने