सकाळी उठल्यावर गुडघे दुखतात, हात वळवताना हाडांचा आवाज येतो, किंवा जिने चढताना पाय कडक होतात? असं काही होत असेल, तर हे दुर्लक्षित करू नका. हेच आर्थ्रायटिसचे (Arthritis) सुरुवातीचे लक्षण असू शकतं.
आज, १२ ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरात 'वर्ल्ड आर्थ्रायटिस डे' म्हणजेच 'जागतिक संधिवात दिवस' साजरा केला जातो. याचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये सांधेदुखी (आर्थ्रायटिस) या वाढत्या विकाराबद्दल जागरूकता निर्माण करणे. सांधे म्हणजे शरीराच्या हालचालींचा आधार, त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहणं अत्यंत आवश्यक आहे.
सांधेदुखी म्हणजे सांध्यांमध्ये होणारी सूज, वेदना आणि हालचालींमध्ये अडथळा. सामान्यतः गुडघे, खांदे, हात, बोटे आणि कंबर या भागांवर त्रास होतो.
ही समस्या केवळ वृद्धांपुरती मर्यादित नाही; आजकाल तरुणांमध्येही ती दिसू लागली आहे. चुकीचा आहार, निष्क्रिय जीवनशैली, वजनवाढ आणि ताण ही यामागची मुख्य कारणं आहेत.
सकाळी उठल्यावर सांधे कडकणे किंवा दुखणे
चालताना, जिने चढताना किंवा बसताना त्रास होणे
सांध्यांत सूज किंवा ताण जाणवणे
हात वळवताना किरकिर आवाज येणे
सतत थकवा किंवा अंगदुखी जाणवणे
(टीप: ही लक्षणे हलकी वाटली तरी दुर्लक्षित करू नका. लवकर उपचार सुरू केल्यास त्रास टाळता येतो.)
अनेक वेळा लोक म्हणतात, “थोडा त्रास आहे, काही दिवसांनी ठीक होईल.” ही दुर्लक्ष केलेली सवय पुढे दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदना आणि गंभीर सांधेदुखीमध्ये रूपांतरित होऊ शकते.
यावर मात करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल गरजेचे आहेत.
१. नियमित व्यायाम
रोज चालणे, स्ट्रेचिंग, योगासने किंवा हलका व्यायाम करा.
यामुळे रक्ताभिसरण सुधारते, सांधे लवचिक राहतात आणि वेदना कमी होतात.
२. हळदीचा काढा किंवा दूध
हळदीतील कर्क्युमिन घटक नैसर्गिकरीत्या सूज कमी करतो.
रात्री हळदीचे दूध किंवा आठवड्यात काही वेळा हळदीचा काढा घेणे फायदेशीर ठरते.
३. वजन नियंत्रण
जास्त वजनामुळे गुडघे आणि कंबर यांवर ताण येतो.
योग्य वजन ठेवल्यास सांधे मजबूत राहतात.
४. पुरेशी झोप आणि ताणमुक्त जीवनशैली
झोप कमी किंवा ताण अधिक असल्यास शरीरात सूज निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात.
ध्यान, प्राणायाम आणि विश्रांतीसाठी वेळ देणे आवश्यक आहे.
जर सतत सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये अडथळा जाणवत असेल, तर वेळ न दवडता ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळेत निदान आणि योग्य उपचारामुळे पुढील गुंतागुंत टाळता येते.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य माहितीवर आधारित आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)