- समाजमनाच्या ललित नोंदी
- लक्ष्मीकांत देशमुख
‘वाचाल तर वाचाल’ असं म्हटलं जातं, कारण पुस्तकांमध्ये तुम्हाला विवेकाचं, सहृदयतेचं, विज्ञाननिष्ठेचं पान सापडतं. व्यक्ती म्हणून स्वत:च्या स्वातंत्र्याची जशी जाणीव होते तशीच समोरच्याच्या स्वातंत्र्याचीही जाणीव होते. तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा, अशी यावर्षीच्या जागतिक वाचक दिनाची थीम आहे. मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. म्हणूनच वाचा.
पाच दशके झाली असली तरी ती रात्र आजही माझ्या चांगली स्मरणात आहे. माझी आई रात्रभर डोळे पुसत, मध्येच हुंदके देत वाचत होती आणि मी पण टक्क जागा राहत तिच्या जवळ बसलो होतो. सायंकाळीच माझी आजी-आईची आई औरंगाबादला (आताचे छत्रपती संभाजीनगर) वारल्याची तार उस्मानाबादला (आताचे धाराशिव) आली होती. रात्री जायला बस नव्हती, म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या बसने मी व आई जाणार होतो. मध्ये लांबलचक न संपणारी दुःखद रात्र होती. जन्मदात्रीचं अंत्यदर्शन पण होणार नव्हतं, या जाणिवेने आई अस्वस्थ होती. स्वतःला सावरण्यासाठी तिनं वाचनालयातून आणलेली, तिचे आवडते लेखक वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ ही कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि सकाळ होईपर्यंत ती वाचत होती. त्यानं ती बरीच शांत व कंपोज्ड झाली होती. तेव्हा माणसाचं दुःख हलकं करण्याची पुस्तकाची ताकद माझ्या लक्षात आली.
आणि पुस्तकाचं वाचन माणसाचं सुख केवळ द्विगुणित नव्हे, तर शतपट करतं हे मला समजलं ते मी इयत्ता नववीत असताना. तेव्हा मी वर्ध्याच्या हिंदी प्रचारसभेची तिसरी परीक्षा प्रथम श्रेणीत पास झालो होतो व माझा धाराशिवच्या कलेक्टरनी सत्कार केला होता. त्याप्रसंगी त्यांनी मला एक हिंदी भाषेतलं पुस्तक भेट दिलं होतं. घरी आल्यावर मी अधाशासारखं ते पुस्तक सलग वाचून काढलं. वाचताना माझं वेळेचं भान जणू हरपलं होतं. त्या वाचनानं माझ्या परीक्षेतील यशाचा आनंद कितीतरी पटीनं वाढल्याचा अनुभव आला होता. ते पुस्तक होतं प्रेमचंदांच्या निवडक कथांचं. त्या दिवशी प्रेमचंदांच्या एवढ्या प्रेमात पडलो की आजही तो ‘जुनूने इष्क’ कायम आहे.
मला आलेल्या या दोन स्वानुभवातून ‘चांगली वाचनीय पुस्तकं माणसाचं दुःख हलकं करतात आणि आनंद शतपटीत करतात’, हे नवं सुभाषित मी बनवलं. ते मी नेहमी माझ्या वाचकांना सांगत असतो.
हे पुस्तक पुराण आज कशासाठी? सांगतो, पण त्या आधी पुढील वाक्य वाचा - “एकदा तुम्हाला वाचनाची गोडी लागली की तुम्ही सर्वार्थाने स्वतंत्र होता.”(फ्रेडरिक डग्लस)
माणसाचे विचार हे घरातले संस्कार, भवतालचं वातावरण, मित्र-शिक्षक आणि तो मानतो ते आदर्श आणि (आजच्या काळात) तो समाज माध्यमांवर जे पाहतो त्यानं घडतात. स्वतःचे स्वतंत्र विचार किती व अशा बाह्य प्रभावानं घडलेले किती, हा एक अभ्यासाचा विषय आहे. पण त्यामुळे कळत-नकळत आज माणसं पूर्वग्रह, अतार्किक विचार आणि खऱ्या-खोट्या इतिहासाचं ओझं घेऊन जगताना, वादविवाद करताना आणि प्रसंगी हिंसक होताना आपण सातत्याने पाहत आहोत. त्यामुळे समाजाच्या सौहार्दाचं वस्त्र विरत चाललं आहे. ते पूर्ववत करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे फ्रेडरिक डग्लस म्हणतो त्याप्रमाणे उत्तम पुस्तकांचं वाचन होय. आपल्या मनातील चुकीच्या विचारांची जळमटं वाचनानं पुसून टाकता येतात आणि आपण मुक्त होतो, एका अर्थाने स्वतंत्र होतो. म्हणजेच आपण विचार, मत आणि समाज माध्यमातून येणारे छद्मज्ञान पारखून, तपासून स्वीकारायला लागतो. थोडक्यात काय, आपण वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र होत जातो. असं होणं म्हणजेच विवेकी व विज्ञाननिष्ठ होणं असतं.
माणसाने अनेक शोध लावले व त्यातून जग संपन्न झालं, पण सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे मुद्रणकलेचा व पर्यायाने लिखित पुस्तकांचा होय, असे मी एक अफाट वाचक व लेखक म्हणून मानतो. त्यातून विकसित झालेली वाचन संस्कृती मानवी संस्कृतीचा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. कारण मानवी संस्कृतीचा पाया प्रेम, करुणा, सहवेदना आणि बंधुता आहे. पुस्तकांच्या वाचनातून माणूस ही सारी मूल्यं सहजतेने स्वीकारतो, ही आता सर्वमान्य झालेली बाब आहे.
हा मुद्दा मी एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. अभिजित देशपांडे यांचे ‘एक होता कारसेवक’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांचं कुटूंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचं होतं, म्हणून ते विशीच्या तरुण वयात कारसेवक म्हणून बाबरी मशीद पाडण्यात सहभागी झाले होते. पण नंतर देशभर जे हिंदू-मुस्लिम दंगे झाले व हजारो माणसं मृत्युमुखी पडली, तेव्हा त्यांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आणि तीव्र शरम वाटली आणि पुढे ते कट्टर हिंदुत्वापासून दूर होत निखळ मानवतावादी झाले. त्यांच्या या आंतरिक परिवर्तनाचं प्रामाणिक कथन त्यांच्या या पुस्तकात आहे. एका माणसाचं हे ३६० डिग्री परिवर्तन झालं, त्याला त्यांचं वैचारिक वाचन व चिंतन कारणीभूत होतं. म्हणूनच चांगली पुस्तकं प्रेम, करुणा, सहवेदना आणि बंधुता या मूल्यांची मनात पेरणी करू शकतात हे सिद्ध करणारं हे उल्लेखनीय उदाहरण आहे.
वैचारिक पुस्तकं माणसांच्या जाणिवा बदलू शकतात, तर ललित साहित्याने म्हणजे कथा, कविता व कादंबरी वाचनाने माणूस अधिक संवेदनशील होतो, अधिक माणूस होतो. कारण माणसाला इतर माणसं, इतरांची सुख-दुःख, आयुष्यातले चढ-उतार, घसरणं व त्यातून नेटानं पुन्हा सावरणं या जीवन संघर्षाबद्दल निकोप कुतूहल असतं, ते ललित साहित्य पूर्ण करतं. कथा-कादंबरी वाचताना आपल्यापेक्षा भिन्न माणसांचं जगणं समजून घेता येतं व आपण अधिक विशाल हृदयी बनतो. जॉर्ज साऊंडर म्हणतो त्याप्रमाणे वाचन ही एक प्रकारची प्रार्थना आहे, ध्यानधारणा आहे; जी आपल्याला आपण पुस्तकातील जणू पात्रे बनलो आहोत, असा विश्वास ठेवायला शिकवते आणि आपणच समाजाच्या केंद्रभागी आहोत हा भ्रम नाहीसा करते. इतर माणसं पण आपल्या इतकीच महत्त्वाची आहेत, याची जाणीव वाचताना होते आणि त्या पुस्तकातील काल्पनिक पण सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पात्राच्या प्रेमात आपण पडतो. मानवी मन, त्याचा स्वभाव व त्याचं जगणं कोणत्याही पूर्वग्रहाचा चष्मा न लावता वाचनातून उमगत जातं. आपलं मनानं इतरांशी बंधुता व करुणेचं नातं जडतं आणि सामाजिक सौहार्द वाढीस लागतं. म्हणून वाचन प्रार्थनेइतकंच महत्त्वाचं आहे.
मी माझ्या ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’ या कादंबरीत दहशतवाद्याची मानसिकता रेखाटली आहे. त्यासाठी त्यांची मानसशास्त्रीय स्थिती व धर्माचा अभ्यास करून ते दहशतवादी का होतात याचा अभ्यास केला. त्या आधारे मी अनेक भाषणं व परिसंवादात असं सांगितलं आहे की, जो नित्यनियमाने ललित साहित्य वाचेल, तो कधीच अतिरेकी/ दहशतवादी होणार नाही.
येत्या २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन आहे, तो शेक्सपियर या महान नाटककाराच्या पुण्यतिथीचा दिवसही आहे. या वर्षाची जागतिक पुस्तक दिनासाठीची युनोस्कोची थीम आहे, ‘Read your way’. म्हणजेच ‘मनचाहे वाचा’. युनोस्कोचा हा उपक्रम जगभरात वाचन संस्कृती विकसित व्हावी व माणूस हा अधिक मानवी व संवेदनशील व्हावा यासाठी आहे. आपल्या देशात आपण १९ जूनला ग्रंथालय चळवळीचे जनक पी. एन. पणीकर यांच्या गौरवार्थ दरवर्षी ‘राष्ट्रीय वाचन दिन’ साजरा करतो. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा केला जातो. या साऱ्या उपक्रमांचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे वाचन संस्कृतीचा सार्वत्रिक प्रसार.
चला, आपण सारे २३ एप्रिल, १९ जून व १५ ऑक्टोबर हे तीन दिवस लक्षात ठेवून त्यादिवशी एक पुस्तक वाचू या. मग पहा, तुम्ही चांगल्या अर्थाने पुस्तकांचे व्यसनी व्हाल. त्यानं तुमचं नुकसान न होता फायदाच होईल याची हमी द्यायला मी तयार आहे. मी ठार वाचन व्यसनी आहे व त्याचा मला किती फायदा झाला म्हणून सांगू? न वाचणारा माणूस एकच आयुष्य जगतो, मात्र माझ्यासारखा चांगला वाचक एकाच आयुष्यात अनेक (पुस्तकातील पात्रांशी समरस होत त्यांची) आयुष्य जगतो आणि भावसमृद्ध होतो.
मला प्रांजळपणे एक सांगू द्या की, मला व माझ्यासारख्या अट्टल वाचकांना इतकं काही अजून वाचायचं आहे की, सात दिवसांचा आठवडा कमी वाटतो. लेन्स डुन्हम म्हणतो तसं झालं तर किती मस्त होईल? - “जरा आपण वास्तववादी होऊ या व प्रत्येक आठवड्यात पूर्णपणे वाचनासाठी वाहिलेला आठवा दिवस समाविष्ट करू या!” तुम्ही विचाराल की हे कसं शक्य आहे? रोज थोडं थोडं वाचलं की सात दिवसांत आठव्या दिवसाइतकं वाचन होईलच की.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानात थोडा बदल करीत “जो जे वांछील तो ते वाचो” अशी शुभेच्छा देत शेवटी एवढंच म्हणतो की, तुम्हा साऱ्यांना २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक व वाचन दिवस (आणि नंतरचे सारे दिवस पण) वाचनानंदाचे जावोत!
ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष.