महाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लाक्षणिक संपाने व्यवहार ठप्प

बाजार समितीने दोन दिवसांपूर्वी या संपाव‍िषयी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सूचना दिली होती.

Swapnil S

नांदेड : राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात निवडणुका न घेता कायमस्वरुपी प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी (दि.२६) राज्यात सर्व बाजार समित्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.

या अनुषंगाने नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा बंद असल्याचे चित्र आहे. यामुळे आठवडयाच्या पहिल्याच द‍िवशी (सोमवारी) होणारी कोट्यावधींची उलाढाल सोमवारी ठप्प होती.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, संभाजीनगर, यवतमाळ, धाराशिव या भागातूनही हळद उत्पादक आपला माल विक्रीसाठी नांदेड येथील बाजारपेठेत आणतात. सध्या हळद, सोयाबीन, तूर, गहू, चना शेतमाल विक्रीसाठी येत आहे. दररोज जवळपास या शेतमालाचे कमी अधिक प्रमाणात दोन ते अडीच हजार कट्टे विक्रीसाठी येतात. हळदीची आवक सर्वाधिक असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत सोमवारी कर्मचाऱ्यांच्या लाक्षणिक संपामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. या संपात कर्मचाऱ्यांसोबतच काही आडते, व्यापारी, हमाल, मापाडी सहभागी झाले होते. कर्मचा-यांनी निबंधकांना मागणीचे निवेदन दिले.

बाजार समितीने दोन दिवसांपूर्वी या संपाव‍िषयी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सूचना दिली होती. त्यामुळे बोटावर मोजणारेच शेतकरी आज शेतमाल विक्रीसाठी घेऊन आले होते. शेतकऱ्यांची चक्कर वाया जाऊ नये म्हणून काही व्यापा-यांनी शेतमाल उतरून घेतला आहे. मात्र, याची खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला नाही. आठवडयाची सुरूवात आजपासून होत असल्याने उलाढाल मोठी असते. संपामुळे व्यवहार ठप्प राहिल्याचे चित्र होते.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी