मुंबई : दुष्काळ मुक्त मराठवाड्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मागासलेला मराठवाडा ही ओळख कायमची मिटवण्यासाठी मराठवाड्याचा विकास हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे सांगून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या २०० देवस्थाने जोडणारा सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्गाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकल्पासाठी २३४ कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, मराठवाड्याच्या विकासासाठी आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकल्पांना १,४३४ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रशांत बंब, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेल यांच्यासह मान्यवरांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी काही स्वातंत्र्य सैनिकांचीही उपस्थिती होती. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी नमस्कार केला.
एकसंध भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटले यांनी पोलिस कारवाई सुरु केली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात हैदराबात मुक्तीसाठी संघर्ष करण्यात आला. यात अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. या सर्व वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिवादन केले. या स्वातंत्र्य लढ्याची येणाऱ्या पिढ्यांना ओळख करुन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १०० कोटी रुपये खर्चून मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रहालय उभे केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
२०२३ च्या मंत्रिमंडळ बैठकीत ४५ हजार कोटींहून अधिक कामांची घोषणा केली आहे. ही कामे फक्त कागदावर ठेवली नसून या योजना प्रत्यक्षात उतरत आहेत. नदीजोड योजना राबवली जात आहे. ‘दुष्काळवाडा ही मराठवाड्याची ओळख पुसायची आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली. मराठवाडा तीर्थक्षेत्र योजनेचा विकास करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वर, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव या देवस्थांनाचा विकास सरकार करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठवाड्यातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण होत आहे. नाबार्डच्या माध्यमातून ४४ रस्त्यांची कामे सुरु आहेत. ७५ ग्राम पंचायतीचे बांधकाम होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरच्या १८ विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
चार लाख विहिरींचे काम मराठवाड्यात सुरु आहे. मराठवाड्यात दुग्धविकासाचा पहिला टप्पा २०२७ पर्यंत पूर्ण होईल. शेंद्रा एमआयडीसीमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक येत आहे. किर्लोस्कर टोयोटाचा प्रकल्प येथे सुरु होत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवण्यात आली आहे. अल्पसंख्याक संशोधन संस्थेसाठी निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेनी यावेळी केली. लाडकी बहीण योजनेंतर्गत पाच हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.