मुंबई : महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातातील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत, या उद्देशाने सरकारने ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गोल्डन अवर’, हा जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. अशावेळी जखमींना तातडीने ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सेवा प्रभावी ठरणार आहे.
राज्यात हवाई रुग्णवाहिका सुरु करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत बोलताना सरनाईक यांनी प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत एसओपी तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
समृद्धी, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा मार्गांना प्राधान्य
समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग या महत्वाच्या मार्गांवर अपघातग्रस्तांना जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेअंतर्गत हवाई रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता, जखमींना सुरक्षितपणे ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्याची कार्यपद्धती आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वय यांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.