संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला; अजित पवार यांचा खळबळजनक आरोप

७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच सही केली होती. त्यांनी माझा केसाने गळा कापला, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Swapnil S

तासगाव : ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच सही केली होती. त्यांनी माझा केसाने गळा कापला, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी तासगाव येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. तासगावमध्ये आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील व संजयकाका यांच्यात लढत होत आहे. ते म्हणाले की, माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर माझ्यावर आरोप झालेल्या दिवसापर्यंत पगाराचा खर्च ४२ हजार कोटी रुपये होता, तर ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कसा केला ? मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले.

या प्रकरणाची फाईल तयार होऊन ती तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे आली. त्यांनी या प्रकरणाची - चौकशी करावी, असे आदेश दिले. या सर्व घटनेनंतर - राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेतला. सरकार पडल्यावर राष्ट्रपती राजवट लागली. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. त्यांनी मला घरी बोलवून गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी चौकशीचे आदेश देणारी स्वाक्षरी केल्याचे दाखवले. मला खूप वाईट वाटले. आपले काहीतरी चुकलं असेल त्यामुळे कामाला लावले असेल, असा आरोप पवारांनी केला.

पवार म्हणाले की, मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना कोणीही भेटायला जात नसल्याने आर. आर. पाटील हे निराश झाले होते. त्यांना मी प्रदेशाध्यक्ष केले. मी प्रत्येकवेळी त्यांना आधार दिला, पाठीशी उभा राहिलो. तंबाखू खाऊ नको हे मी त्यांना अनेकदा सांगितले, मी नसलो की गुपचूप घ्यायचा. दुर्दैवाने हे झाले, असे त्यांनी सांगितले.

अजितदादांच्या वक्तव्याने कुटुंब दुखावले - रोहित पाटील

अजितदादांच्या आरोपांवर आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील म्हणाले की, माझे वडील जाऊन नऊ वर्षे झाली आहेत. आता नऊ वर्षांनंतर अजित पवार यांनी मळमळ बोलून दाखवली. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांना दुःख झाले आहे. त्या काळी काय घडले याची उत्तरे आबा गेल्यानंतर आम्ही देऊ शकत नाही. आबा प्रामाणिकपणाने, स्वच्छपणाने काम करत होते. ते गेल्यानंतर नऊ वर्षांनी असा आरोप होत असेल तर दुःख होते. अजितदादा यांच्या वक्तव्याने आमचे कुटुंबीय दुखावले गेले आहे.

सिंचन घोटाळ्यात मी चौकशी लावली नव्हती - पृथ्वीबाबा

मी सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला दिला होता. तेव्हा मी माझ्या कार्यकाळात कधीही ७० हजार कोटीचा घोटाळा शब्द वापरला नव्हता. ती फाईल माझ्याकडे आली नाही. त्या फाईलवर माझी कुठलीही सही नाही. त्यामुळे सिंचन घोटाळा प्रकरणात मी चौकशी लावली नव्हती. मात्र, नाहक माझा बळी घेतला. अजित पवारांनी २०१४ ला माझे सरकार पाडले आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

जरांगेंचे ३ नोव्हेंबरला ठरणार; उमेदवार, मतदारसंघ जाहीर करणार

शिंदे, अजितदादा गटात भाजपच्या १६ नेत्यांची घुसखोरी!

सिंचन घोटाळा चौकशी फाईल गोपनीयतेचा भंग नाही; देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

सत्तेसाठी एखाद्याचा पक्ष फोडणे अनुचित; शरद पवारांचे टीकास्त्र

दाऊदशी आपले नाव जोडणाऱ्यांना कोर्टात खेचणार; नवाब मलिक यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा