भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येने राज्यात गदारोळ माजला. या प्रकरणाचा सध्या सखोल तपास सुरु आहे. अशातच, या तपासासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी (५ डिसेंबर) घेण्यात आला, अशी माहिती मंगळवारी (९ डिसेंबर) अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
"झोन ४ च्या उपायुक्त रागसूधा आर. या ८ सदस्यीय विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्व करणार आहेत. आरोपांच्या संवेदनशील स्वरूपामुळे विशेष युनिटची आवश्यकता भासली," असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या २८ वर्षीय डॉ. गौरी यांनी २२ नोव्हेंबरला वरळीतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले. डेन्टिस्ट असणाऱ्या गौरीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून २४ नोव्हेंबरला रात्री १ वाजता वरळी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी २ डिसेंबरपर्यंत वाढवली होती.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अनेक जखमा
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, गौरीच्या शरीरावर जखमा आढळल्या असून मानेवर डाग दिसून आले. याउलट, अनंत गर्जे यांच्या हातावरही ओरखडे दिसले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, "ते इमारतीच्या ‘रिफ्युजी एरिया’च्या खिडकीतून घरात गेले तेव्हा ओरखडे आले." मात्र पोलिसांच्या मते, दोघांमध्ये धक्का-बुक्की किंवा झटापट झाली असावी.
मोबाईलमधील ऑडिओ क्लिप्सकडे SIT चे लक्ष
अनंत गर्जेच्या फोनमध्ये दोघांमधील वाद, तणावपूर्ण संभाषणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग मिळाले आहेत. हे तपासात निर्णायक ठरू शकते.
बहिण व भाऊवरही गुन्हा; दोघे फरार
एफआयआरमध्ये अनंत गर्जेसोबत त्यांची बहीण शीतल गर्जे व भाऊ अजित गर्जे यांच्यावरही मानसिक छळ, मारहाण आणि आत्महत्येस प्रवृत्ती केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ते दोघेही फरार असून त्यांच्यावर BNS कलम १०८, ८५, ३५२ व ३५१ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मृत्यूपूर्वी गौरीला मिळाले धक्कादायक कागदपत्र
गौरी आणि अनंत यांचे अवघे दहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. परंतु घर शिफ्टिंग करताना पतीच्या प्रेयसीबाबतची आणि गर्भधारणेबाबतची धक्कादायक माहिती हातात आल्यानंतरच दोघांमधील वादाची सुरुवात झाली, असा दावा गौरीच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे गौरी मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या व त्याचा घटनाक्रमाशी संबंध असू शकतो, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.
SIT कडून सखोल व स्वतंत्र तपास
या सर्व पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर SIT तपास प्रकरणाला नवी दिशा देऊ शकतो आणि गौरी पालवे–गर्जे यांच्या मृत्यूमागील नेमका घटनाक्रम उलगडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.