भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास काय? १८१८ च्या लढाईपासून बाबासाहेबांच्या मानवंदनेच्या शताब्दीपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास 
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास काय? १८१८ च्या लढाईपासून बाबासाहेबांच्या मानवंदनेच्या शताब्दीपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास

१८१८ मधील भीमा कोरेगावची लढाई भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही लढाई पेशवाईच्या अखेरच्या टप्प्यात घडली.

किशोरी घायवट-उबाळे

भीमा कोरेगाव हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. येथील १८१८ मधील भीमा कोरेगावची लढाई भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही लढाई पेशवाईच्या अखेरच्या टप्प्यात घडली.

भीमा कोरेगावची लढाई

१ जानेवारी १८१८ रोजी भीमा नदीच्या काठी, कोरेगाव येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवा बाजीराव दुसरा यांच्या सैन्यात लढाई झाली. या लढाईत ब्रिटिशांकडून ८०० सैनिक होते, त्यापैकी ५०० सैनिकांचा हिस्सा महार समाजातील होता. दुसरीकडे पेशव्यांचे सैन्य संख्येने अधिक म्हणजे २० ते २५ हजार इतके होते.

संख्येने कमी असूनही ब्रिटिश सैन्याने पेशव्यांच्या फौजेला रोखले आणि पेशव्यांचा पराभव झाला. ही लढाई पेशवाईच्या अस्ताचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली.

विजयस्तंभाची स्थापना

या विजयाच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी १८५१ साली भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ उभारला. या स्तंभावर लढाईत सहभागी झालेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैनिकांची नावे आहेत.

सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व

भीमा कोरेगावची लढाई केवळ लष्करी विजयापुरती मर्यादित नाही, तर तिचे सामाजिक महत्त्व मोठे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या स्थळाला भेट दिल्यानंतर या लढाईला दलित समाजाच्या शौर्याचे व आत्मसन्मानाचे प्रतीक म्हणून विशेष ओळख मिळाली.

बाबासाहेबांच्या मानवंदनेचे शताब्दी वर्ष

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला दिलेल्या भेटीला येत्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदाचे वर्ष हे बाबासाहेबांच्या मानवंदनेचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या शताब्दी वर्षाची औपचारिक सुरुवात १ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, यानिमित्ताने बाबासाहेबांसोबत विजयस्तंभावर अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांच्या कुटुंबीयांचे संयुक्त अभिवादन करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

निवृत्त सैनिकांकडून महार रेजिमेंटला मानवंदना

शौर्यस्तंभावरून प्रेरणा घेऊन महार रेजिमेंटची स्थापना करण्याची मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली केली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक लष्करी इतमामाने विजयस्तंभावर मानवंदना देतात. यंदा यशसिद्धी आजी-माजी सैनिक फाऊंडेशनच्या वतीने सुमारे ३,००० निवृत्त सैनिकांकडून राष्ट्रगीताद्वारे महार रेजिमेंटला मानवंदना देण्यात येणार आहे.

आज भीमा कोरेगाव हे ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय चर्चेचे केंद्र ठरले आहे. इतिहास, सामाजिक चळवळी आणि आधुनिक राजकारण या तिन्ही अंगांनी या स्थळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

"आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार...." ; संजय राऊतांना धमकी, बंगल्याच्या सुरक्षेत वाढ, बॉम्बशोधक पथक दाखल

कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधीच भाजपच्या महिला उमेदवारांचा विजय; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "भाजपचं खातं...

धनंजय मुंडेंना क्लीन चिट; आरोप तथ्यहीन ठरवत करुणा शर्मांची फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली, नेमके प्रकरण काय?

Pune Traffic Update : नववर्षाच्या जल्लोषासाठी फिरायला जाताय? मग त्याआधी पुण्यातील वाहतुकीचे 'हे' बदल वाचाच

"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स