मुंबई : भाजपचे देशप्रेम हे ‘फेक नरेटिव्ह’ आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशासंदर्भात चांगली भूमिका घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, ही भूमिका शिवसेनाप्रमुखांची होती. परंतु ते आता आम्हाला देशप्रेम शिकवत आहेत. ज्यांचा स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंध नाही, त्यांच्याकडे देशाची सूत्र गेली आहेत. संघवाले गच्चीवर लाठ्याकाठ्या घेऊन बसतात. ते लोक आम्हाला हिंदुत्व शिकवतात, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली.
मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी ईशान्य मुंबईतील निर्धार शिबीर घेतले. या शिबिरात त्यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, रविवारी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असल्याचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांची दांडी उडवणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात आपली सत्ता मी आणणार, त्यांना सोडणार नाही. आम्ही जय श्रीराम बोलू, पण भाजपला ‘जय शिवाजी, जय भवानी’ बोलण्यास लावू. प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार, असे त्यांनी सांगितले.
सामना दुबईत सुरू आहे. टीव्हीवर सामना बघू शकतो. त्यासाठी दुबईत जाण्याची काय गरज? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे लोक दुबईत गेले होते. ते भारत-पाक सामना पाहत होते. फोटो काढत होते. पाकिस्तानी खेळाडू शेजारी बसले होते. भाजप नेत्यांचे घराणेशाहीवाले जय शहा गेले होते. हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहेत का? उद्धव किंवा आदित्य ठाकरे दुबईत गेले असते तर गदारोळ केला असता. मोहन भागवत मशिदीत जातात. उद्धव ठाकरे गेले नाहीत अजून, पण गेल्यावर त्यांनी काय केले असते? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
प्रयागराजला का गेले नाही?
उद्धव ठाकरे यांनी, प्रयागराजमधील कुंभमेळ्यात का गेलो नाही त्याचे उपहासात्मक कारण सांगितले. ते म्हणाले, आम्ही मोहन भागवतांचे फॉलोवर आहोत. ते जे करतात ते आम्ही करतो. मोहन भागवत गेले नाहीत, तर मी कसा प्रयागराजला जाऊ. ते स्वत: जात नाहीत आणि लोकांना सांगतात. उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यात फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावे. २१०० रुपये लाडक्या बहिणींना जाहीर करून दाखवावे. मग माझी बरोबरी करावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.
फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर
“२०१२ साली आपण फक्त दोन शब्दांवर मुंबई जिंकली होती, ‘करून दाखवलं’, २०१७ ला पण तेच केले. देवेंद्र फडणवीस यांना म्हणावे, कोस्टल रोड हे कर्तृत्व तुमचे नाही. माझ्या शिवसेनेचे आहे. त्याचे भूमिपूजन मी केलेले आहे. शिवडी-न्हावाशेवा पुलाचे उद्घाटन तुम्ही केले, तरीही त्याचा पहिला गर्डर मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या हाताने टाकलेला आहे. कोरोना काळात मेट्रोची कामे, कोस्टल रोडचे काम बंद पडू दिले नव्हते. रुग्णालयात ज्या तुम्हाला कधी आयुष्यात जमल्या नसत्या एवढ्या सेवासुविधा आम्ही महाराष्ट्राला दिल्या होत्या. फक्त तुमच्या मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी मी केली नाही, असे ठाकरे म्हणाले. ही लढाई पक्षाची लढाई नाही. ही लढाई राजकीय
लढाई नाही. ही आपल्या मातृभाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.