पुणे : नीट पेपरफुटीप्रकरणी ‘सीबीआय’ने आणखी मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी आणखी एका प्राध्यापिकेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पुण्यातून मनीषा नावाने अटक होणारी ही तिसरी महिला आहे. मनीषा हवालदार या फिजिक्सच्या प्राध्यापिका आहेत, अशी माहिती आहे.
नीट परीक्षेचा पेपर ठरवणाऱ्या ‘एनटीए’मध्ये एक्सपर्ट म्हणून मनीषा हवालदार हिचा समावेश होता. पेपर सेट करण्यासाठी विषयाच्या तज्ज्ञ प्राध्यापिका म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली होती. मनीषा हवालदार पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशाला येथे कार्यरत होती. फिजिक्स विषयात तज्ज्ञ असणारी मनीषा हवालदार बायोलॉजीची तज्ज्ञ प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्या संपर्कात होती. मनीषा मांढरे ही बायोलॉजीची प्राध्यापिका होती. सीबीआयने तिलादेखील अटक केली आहे. त्याआधी ती जिच्यासोबत मिळून पेपर फोडायची त्या ब्युटी पार्लरवाली मनीषा वाघमारे हिलादेखील अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेसह मिळून मनीषा हवालदारने फिजिक्सचे प्रश्न लीक केल्याचा आरोप आहे. ते लीक केलेले सर्व प्रश्न तपासण्यात आले. यावेळी लीक झालेले प्रश्न हे नीटच्या प्रश्न पत्रिकेसोबत तंतोतंत जुळल्याचे तपासात पुढे आले आहे.
पेपरफुटीप्रकरणी अकरावी अटक
आतापर्यंत या प्रकरणी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, लातूर दिल्ली, जयपूर, गुरुग्राम अशा विविध शहरांमधून आरोपींना अटक करण्यात आली आहे. याआधी दहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पुण्यात फिजिक्सची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिला अटक करण्यात आली आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी ही अकरावी अटक आहे. यामधील सात आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत आणि चार आरोपी हे बाहेरच्या राज्यातील आहेत.