महाराष्ट्र

सन आयलाय गो, नारली पुनवेचा! राज्यभर आज नारळी पाैर्णिमेचा जल्लोष; कोळीबांधवांच्या आनंदाला उधाण

सन आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनवेचा! मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा!... नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांच्या उत्साहाचा, आपल्या रूढी, परंपरा जपण्याचा सण. दोन महिन्यांच्या मत्स्यबंदीनंतर सुस्तावलेल्या कोळीवाड्यांना एका वेगळ्याच उर्जेचे स्फुरण देणारा. कोळी लोकांचा सर्वात मोठा सण असलेल्या नारळी पौर्णिमेसाठी एव्हाना सर्व कोळीवाडे तसेच समुद्रावर स्वार होण्यासाठी होड्या सजल्या आहेत.

Swapnil S

तुषार वैती / मुंबई

सन आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनवेचा! मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा!... नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांच्या उत्साहाचा, आपल्या रूढी, परंपरा जपण्याचा सण. दोन महिन्यांच्या मत्स्यबंदीनंतर सुस्तावलेल्या कोळीवाड्यांना एका वेगळ्याच उर्जेचे स्फुरण देणारा. कोळी लोकांचा सर्वात मोठा सण असलेल्या नारळी पौर्णिमेसाठी एव्हाना सर्व कोळीवाडे तसेच समुद्रावर स्वार होण्यासाठी होड्या सजल्या आहेत. शुक्रवारी दर्यादेवताला सोन्याचा नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे या दर्याराजाकडे मांडून यंदाच्या मत्स्यमाैसमाला सुरुवात होईल.

श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. नागपंचमीनंतर येणारी नारळी पौर्णिमा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल्या अथांग समुद्रकिनारी राहणाऱ्या सर्वांसाठी तसेच कोळी समाजासाठी महत्त्वाचा सण. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वेंगुर्ला, अलिबागपासून ते उरण, पनवेल तसेच नवी मुंबई, ठाणे, पालघर, वसई, वरळी, माहिम, कुलाबा आणि मुंबईतील प्रमुख कोळीवाड्यांमध्ये या दिवशी सोन्याच्या नारळाची प्रतिकृती तयार करून वाजतगाजत मिरवणुकीद्वारे दर्याला नारळ अर्पण केला जातो.

हल्लीच्या जमान्यात या सणालाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पारंपरिक वेशभूषेसह सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या कोळी महिला तसेच आबालवृद्धांसह लहान मुलेही या मिरवणुकीत सहभागी होतात. सात बेटांनी सजलेल्या या मुंबईतील कोळी समाजाने आजही आपल्या रुढी, परंपरा कायम राखत नारळी पौर्णिमेच्या सणाचे महत्त्व टिकवून ठेवले आहे.

पावसाळ्यात मासेमारीला बंदी असते. पूर्वी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाहिल्यानंतर मासेमारीला सुरुवात व्हायची. पण गेल्या काही वर्षांपासून १ ऑगस्टपासूनच मासेमारीचा हंगाम सुरू होतो. पण आजही या सणाला कोळी समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसाळ्यात खवळलेल्या खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. त्यामुळेच नारळी पोर्णिमेच्या दिवशी दर्यादेवाला सोन्याचा नारळ अर्पण करून आमच्या कोळी बांधवांचे रक्षण कर, अशी साद घातली जाते. दर्याला यथाशक्ती नारळ अर्पण करून कोळी बांधव आपल्या ‘होऱ्या’ वल्हवत ‘म्हावरं’ धरण्यासाठी पुन्हा एकदा ‘दर्या’च्या उसळत्या लाटांशी स्पर्धा करू लागतात.

प्रत्येक कोळीवाड्यात निघणारी मिरवणूक ही सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. अगदी कुलाबा, वरळी कोळीवाड्यापासून ते वसई, पालघर, उरण, रत्नागिरी, मालवण या ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात. दुपार झाल्यानंतर खरेदी केलेले भरजरी कपडे घालून किंवा आपला कोळी समाजाचा पारंपरिक पोशाख घालून कोळी बांधव-भगिनी समुद्राच्या दिशेने यायला सुरुवात करतात. वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर अखेरीस समुद्राच्या ठिकाणी येऊन नारळाची विधिवत पूजा करून तो समुद्राला अर्पण करताना प्रत्येकामध्ये एक वेगळाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतो.

नारळ फोडाफोडीला महागाईचा फटका

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. तसेच या दिवशी नारळ फोडाफोडीच्या खेळालाही तितकेच महत्त्व आहे. वरळी, अलिबाग, मालवण, उरण, चेंदणी, वसईतील नायगांव, खोचिवडे, अर्नाळा या कोळीवाड्यांनी ही परंपरा टिकवली आहे. काही ठिकाणी हातावर तर काही ठिकाणी जमिनीवर नारळ ठेवून फोडण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. त्यासाठी मोठमोठ्या बक्षीस रकमांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. अलिबाग, मालवण या ठिकाणी जवळपास महिनाभर या स्पर्धा होत असतात. मात्र, नारळाच्या एका नगाची किंमत किमान ५० रुपयांच्या वर गेल्याने त्याचा फटका यंदा नारळ फोडाफोडीला बसणार आहे.

वरळी कोळीवाड्याने आजही नारळी पाैर्णिमेची रूढी, परंपरा आजतागायत टिकवली आहे. एकसारखे कपडे घालून बँडच्या तालावर सोन्याचा नारळ वाहून निसर्गाला, दर्याला गाऱ्हाणे घातले जाते. “आता आम्ही मासे पकडायला जाणार आहोत. तुझं खवळलेलं रूप जरा आवरतं घे. समुद्रामार्गे येणारं संकट दूर कर. आमच्या कोळी बांधवांच्या धंद्याला यश दे,” असं गाऱ्हाणं घातलं जातं. यापूर्वी शासनाचाही नारळ वरळी कोळीवाड्यात अर्पण केला जायचा. आर. आर. पाटील, छगन भुजबळ यांसारखे नेते येऊन त्यांनी शासनातर्फे विधिवत पूजा केल्याची उदाहरणेही आहेत.
विजय वरळीकर (वरळी कोळीवाड्याचे पाटील आणि नॅशनल असो. ऑफ फिशरमनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष)

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती