छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा संग्रहित फोटो
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, क्रांती चौकात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे आणि शिंदेंची शिवसेना तसेच ठाकरे गटाच्या शिवसेनेने रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या निमित्ताने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते क्रांती चौकात एकत्र आले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. आज अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे आणि शिंदेंची शिवसेना तसेच ठाकरे गटाच्या शिवसेनेने रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या निमित्ताने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते क्रांती चौकात एकत्र आले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच हातात भगवे झेंडे घेऊन एकमेकांसमोर फडकवण्यात आले. त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. ऐनवेळी राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात थेट लढत आहे. या लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात दि. १३ मे रोजी मतदान आहे. त्यामुळे आज या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगर शहरात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली क्रांती चौकात पोहोचली. यावेळी शिंदे सेनेची रॅली क्रांती चौकातून टीव्ही सेंटरच्या दिशेने जात होती, तर ठाकरे गटाची रॅली क्रांती चौकातून निघाली होती. तेव्हा शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने समोरासमोर आले. त्यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हातात दारूची बाटली आणि नोटा घेऊन शिंदे गट आणि मनसेला डिवचले. यावेळी दानवे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करताच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत एकमेकांवर धावून जात होते. त्यामुळे क्रांती चौकात तणाव वाढला होता.

ठाकरे गटाचे कार्यकर्ते पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा देत होते, तर अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा दारूचा व्यवसाय आहे. त्यामुळे आपण दारूची बाटली दाखवत आहे, असे म्हटले. एवढेच नव्हे, तर पैठणची दारू संभाजीनगरमध्ये आणायची का, असा सवाल उपस्थित केला. यावेळी दानवे यांनी जर आमच्या कार्यकर्त्यांवर कुणी हात उचलला तर त्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असे दानवे म्हणाले. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी करतानाच एकमेकांच्या अंगावर कार्यकर्ते धावून जात होते. त्यामुळे बराचवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. त्यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना बाजूला सारले.

जंजाळ यांनी थोपटले दंड

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज रॅलीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याने शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात दंड थोपटले. त्याचवेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेरेबाजी सुरू केली. त्यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आक्रमक झाले. तेव्हा कार्यकर्तेही सरसावले. यातून चांगलाच गोंधळ उडाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी