मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. दरम्यान, नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्यात आली आहे.
मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ व नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’वर संबंधितांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालक मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ॲडमिरल अजय कोचर, रियर ॲडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके आदी उपस्थित होते.
छत्रपतींचा पुतळा नव्याने भव्य स्वरूपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिल्पकार जयदीप आपटे संघाचा माणूस - पटोले
शिवरायांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केला. राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा ब्रॉन्झचा होता, पण त्याच्या डोक्याजवळच्या भागात कापूस अन् कागद आढळल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शिल्पकार जयदीप आपटे हा संघाचा माणूस आहे. त्याला मूर्तिकलेचा कोणताही अनुभव नव्हता. त्यानंतरही त्याला कोणत्या आधारावर छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले? अशा माणसाला काम देण्याचे कारण काय? असे सवाल पटोले यांनी केले.
सिंधुदुर्गमधील तिन्ही कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार गृहमंत्री - सुषमा अंधारे
राणे पिता-पुत्राच्या गुंडगिरीविरोधात सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये गुरुवारी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या आंदोलनाचा व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला की, पत्रकार, सामान्य नागरिक, पोलीस यांच्याशी सतत दमदाटीची भाषा, गुंडागर्दी करून सामाजिक प्रदूषण पसरवणाऱ्या राणेंवर गुन्हे दाखल होत नाहीत, याचा अर्थ या तीनही कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत अन् त्यांना जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करायचा आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
आपटेच्या पत्नीची पोलिसांकडून चौकशी
शिल्पकार आपटे याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मालवण पोलीस गुरुवारी सकाळी कल्याणमध्ये दाखल झाले असता आपटेच्या घरावर टाळे होते. त्याची पत्नी निशिगंधा ही सुरक्षिततेच्या दृष्टीने कल्याणमधील घरात न राहता माहेरी आपल्या आई, वडिलांच्या घरी राहण्यास गेली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिचा जबाब नोंदवला.
६ फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली होती
आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ ६ फुटांचा शिवरायांचा पुतळा बसवण्याची परवानगी दिल्याचा दावा राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची उंची वाढली कशी? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात कुठेही महापुरुषांचा पुतळा उभा करायाचा असेल, तर कला संचालनालयाची परवानगी घेणे बंधनकारक असते, अन्यथा कुणालाही पुतळा उभारता येत नाही.
शिल्पकार जयदीप आपटेच्या घराला संभाजी ब्रिगेडने काळे फासले
राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळण्यास कारणीभूत असलेले शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घरासमोर गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी आपटेच्या घराला काळे फासण्यात आले. तसेच शिल्पकार आपटेच्या छायाचित्रांवर ‘शिवद्रोही’ असे लिहून ती भित्तीचित्रे आपटे याच्या दरवाजावर चिकटवण्यात आली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिल्पकार आपटेला पाठबळ देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटेला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी निकृष्ट काम करून महाराजांना अपमान केला आहे, अशा शब्दांत ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आपटेचा निषेध केला.
शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून मी माफी मागेन - मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने आम्हाला वेदना झालेल्या आहेत. ही घटना व्हायला नको होती. परंतु, या घटनेनंतर आम्ही काल बैठक घेऊन दोन समित्या नेमल्या आहेत. जो पुतळा पडला त्याची चौकशी केली जाईल, तर दुसरी समिती ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. मुळात या घटनेवरून कोणीही राजकारण करू नये, शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून मी एकदा नव्हे तर अनेकदा माफी मागेन, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.