महाराष्ट्र

चित्रा वाघ यांनी घेतली स्वाती मोहोळ यांची भेट; सांत्वन करत म्हणाल्या...

तुमच्यावरील कुठल्याही संकटाच्या मुकाबल्यासाठी आम्हीही आपल्या सोबत असू, असा शब्द चित्रा वाघ यांनी स्वाती मोहोळ यांना दिला.

Rakesh Mali

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची सहा जानेवारी रोजी पुण्याच्या कोथरूडमधील सुतारदरा येथे भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोहोळ याचा साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकरने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही हत्या केली होती. अशात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतल्याने चर्चांना उधान आले आहे. "स्वातीताई व मोहोळ कुटुंबीयांवर कोसळलेल्या संकटामध्ये त्यांचे सांत्वन करण्यासाठी आज आम्ही त्यांच्या पुण्यातल्या कोथरूडमधील निवासस्थानी भेट घेतली, असे वाघ यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

"हिंदुत्वाची पताका हाती धरलेल्या शरद मोहोळ यांचे काही काळापासून पुणे परिसरात हिंदुत्व जनजागृती, गो रक्षण आणि लोकसेवेचे काम सुरू होते. या कार्यात त्यांच्या पत्नी स्वाती मोहोळ याही खांद्याला खांदा देऊन साथ निभावत होत्या. पतीची साथ अर्ध्यावरच सुटली असली तरी स्वातीताई शरदभाऊंचे हिंदुत्व जागृतीचे काम नेटाने पुढे नेतील", असे चित्र वाघ म्हणाल्या. तसेच, तुमच्यावरील कुठल्याही संकटाच्या मुकाबल्यासाठी आम्हीही आपल्या सोबत असू, असा शब्द देखील त्यांनी स्वाती मोहोळ यांना दिला. वाघ यांनी आपल्या 'एक्स'हँडलवर या सांत्वन भेटीबाबतची माहिती दिली आहे.

नितेश राणेंनीही घेतली होती भेट-

भाजप आमदार नितेश राणे यांनीही नऊ जानेवारी रोजी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली होती. "मोहोळ कुटुंब हे हिंदुत्वाच्या कार्यात नेहमी अग्रेसर राहिले आहे. संकटकाळात मोहोळ कुटुंबाच्या मागे उभे राहणे हे एक हिंदू म्हणून आमचे कर्तव्य आहे. पुण्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते व स्वातीवहिनी यांनी खचून न जाता हिंदुत्वाचे काम पुढे घेऊन जाणे हीच शरद मोहोळ यांना श्रद्धांजली असेल!, असे नितेश राणे यांनी म्हटले होते.

फडणवीसांनी केला होता गुंड म्हणून उल्लेख-

शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले होते. "या कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्त शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही”, असे फडणवीस म्हणाले होते.

स्वाती मोहोळ भाजपच्या पदाधिकारी-

स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी 2022 साली भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा झाली होती. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला होता. स्वाती यांना त्यांच्या वॉर्डमधून नगरसेवकासाठी तिकीट मिळणार असल्याची देखील चर्चा होती. तसेच, स्वाती मोहोळ यांच्या पाठोपाठ शरद मोहळ देखील राजकारण प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, शरद मोहोळ याच्या हत्येनंतर स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांची भेट घेत "मला न्याय मिळावा, हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी", अशी मागणी केली होती.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले