राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्षातील बहुतेक नेते, आमदार विधानभवानात उपस्थित होते. दरम्यान सद्यपरिस्थितीत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. एवढंच नाही तर दोघंही एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी या भेटीवर मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. आता आमच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू, असं गंमतीशीर उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
अन् उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट...
आज पावसाळी अधिवेशनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते लिफ्टजवळ उभे होते. नेमकं त्याचवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर लिफ्टजवळ आले. त्यानंतर लिफ्ट येईपर्यंत दोघांनी चर्चा केली. एवढंच नव्हे दोघंही एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले.
इथून पुढच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, "लिफ्टमध्ये फडणवीस आणि मी एकत्र होतो. अनेकांना 'ना ना करते प्यार...' या गाण्यासारखं वाटलं असेल. ती एक योगायोगानं झालेली अनौपचारिक भेट होती. भिंतीला कान असतात, पण लिफ्टला कान नसतात. त्यामुळं इथून पुढच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू."
चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिलं चॉकलेट:
आज सकाळी विधानभवनात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. आज सकाळी विधानभवानात येताच उद्धव ठाकरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात गेले. काहीच वेळात तिथं भाजप नेते आणि राज्याचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदारांचे स्वागत केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना चॉकलेट दिलं. त्याचबरोबर अनिल परब यांना पेढा भरवत शुभेच्छाही दिल्या. अलीकडच्या काळात भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा पाहता, हे चित्र निश्चितच सुखावणारं होतं.