वरिष्ठांना शाळेचा प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या तसेच शाळेला समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळ्यात महिला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. रोहिणी नांद्रे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांना कमी आढळून आली. यासंदर्भात वरिष्ठांना शाळेचा प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेला समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात रोहिणी नांद्रे यांनी स्वतः करिता आणि शिक्षण अधिकारी कुवर यांच्या करिता दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नांद्रे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद तसेच शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.