एक्स
महाराष्ट्र

महायुतीत असंतोष; मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तिन्ही पक्षांमध्ये नाराजी

मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून आता महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. आता खातेवाटपानंतर त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

Swapnil S

नागपूर : मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून आता महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. आता खातेवाटपानंतर त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याने त्यांची नाराजी उफाळून आलेली असतानाच मंत्रीपदाची झूल अंगावर चढविता येईल या आशेने प्रतीक्षेत असलेल्या अनेक इच्छुकांचाही भ्रमनिरास झाल्याने तेही नाराज झाले आहेत. यात प्रामुख्याने छगन भुजब‌ळ, सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे, राजेंद्र गावित, तानाजी सावंत, रवी राणा यांचा समावेश आहे.

नाव कसे वगळले याबद्दल अनभिज्ञ - मुनगंटीवार

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि विजयकुमार गावित यांनाही मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्यावरून मुनगंटीवार यांची नाराजीही उफाळून आली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत आपले नाव होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्याला आश्वस्त केले होते, मात्र ऐनवेळी यादीतून नाव वगळण्यात आले त्याचे कारण मात्र आपल्याला कळले नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आपण नाराज नाही, आपण संघटनात्मक व्यक्ती आहोत. मतदारसंघातील जनतेसाठी आपण काम करीत राहू,असेही ते म्हणाले. फडणवीस यांनीही मुनगंटीवार यांच्याकडे अन्य जबाबदार सोपविली जाण्याची शक्यता आहे, असे सांगितले. आपले नाव यादीत नसल्याने नाराज होण्याचा प्रश्न नाही, मात्र शनिवारपर्यंत यादीत असलेले नाव रविवारी कसे वगळण्यात आले त्याची आपल्याला कल्पना नाही, असे ते म्हणाले. सोमवारी नागपूरमध्ये असतानाही ते विधानसभेत आले नाहीत. मात्र, त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवाससथानी भेट घेतली.

नाराज नाही - केसरकर

शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही, मात्र त्याबद्दल आपण नाराज नसल्याचे ते म्हणाले. आपण पक्षाच्या नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत, ते जो निर्णय घेतील तो मान्य आहे, असे केसरकर म्हणाले. पक्षाच्या नेत्यांना, प्रतिनिधित्व देताना प्रादेशिक आणि समाज यामध्ये, समतोल साधावा लागतो त्यामुळे काही वेळा राजकीय सक्ती असते, असेही ते म्हणाले.

शिवतारे आक्रमक

मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्याने नाराज झालेले शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अडीच वर्षांनंतर मंत्रीपद दिले तरी ते स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करून शिवतारे यांनी सुरुवातीपासूनच बंड पुकारले आहे. आम्ही गुलाम नाही, आपण केवळ नाराजच नाही तर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने आपल्याला वर्तणूक दिली त्याने अधिक दुखावलो आहे. या नेत्यांनी आपल्याला भेटण्याचीही तसदी घेतली नाही, आता अडीच वर्षांनंतरही आपण मंत्रिपद स्वीकारणार नाही. त्यापेक्षा आपण मतदारसंघातील विकासकामे कशी होतील त्याकडे लक्ष देऊ, महाराष्ट्र ज्या दिशेने जात आहे त्याबद्दल आपल्याला दु:ख आहे, आपण बिहारच्या दिशेने जात आहोत का, असेही शिवतारे म्हणाले.

राजेंद्र गावितही नाराज

राजेंद्र गावित यांनी नाराजीचा सूर आळवताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आदिवासी मंत्र्यांचा समावेश केला आहे, मात्र सहा आदिवासी आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांनी त्यापैकी एकालाही मंत्री केले नाही.

अधिवेशन सोडून तानाजी सावंत मतदारसंघात

माजी मंत्री तानाजी सावंत यांनीही नाराजी व्यक्त केली असून ते अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघात निघून गेल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर सावंत यांनी आपल्या फेसबुकचा डीपी, शिवसेना नाव, चिन्हं प्रोफाईलही हटविले आहे, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

रवी राणाही नाराज

बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनाही मंत्रिमंडळातील समावेशाची आशा होती, मात्र वर्णी न लागल्याने ते तडकाफडकी मतदारसंघात निघून गेले.

भुजबळांना मंत्रिपद मिळाले नाही हा त्यांचा राजकीय प्रश्न - जरांगे

भुजबळांना मंत्रिमंडळात घेतले नाही, हा प्रश्न आमचा नाही. त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही, हा त्यांचा राजकीय प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याशी आमचा काहीच संबंध नाही. ओबीसीतीलही गोरगरिबांना त्यांनी काही खाऊ दिलेले नाही. आम्हाला त्या राजकीय विषयात पडायचे नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, छगन भुजबळांवर निशाणा साधत असताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही पुन्हा आंदोलन उभे करणार आहोत. त्याची तारीख उद्या जाहीर केली जाईल. जाहीर केलेल्या तारखेला संपूर्ण राज्यातून पुन्हा एकदा मराठे अंतरवाली सराटी इथे येतील आणि मराठ्यांची ताकद देशाला दिसेल, असा दावा जरांगे पाटलांनी केला आहे.

वहाँ नहीं रहना - भुजबळ

या नाराजीनाट्याचा बंडाचा झेंडा सर्वप्रथम राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी फडकावला. 'जहॉं नहीं चैना, वहॉं नहीं रहना', असे सूचक विधान करीत भविष्यातील दिशा समता परिषदेशी आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरविली जाईल, असे विधान त्यांनी केले आणि राज्यसभेची खासदारकी देण्याचा त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेला प्रस्तावही त्यांनी सपशेल धुडकावला. मंत्रिपद येते-जाते, आपल्याला कोणीही संपवू शकत नाही, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याविरुद्ध दंड थोपटले त्याचे फळ मिळाले, असेही ते म्हणाले आणि अधिवेशन सोडून ते नाशिकला रवाना झाल्याचे सागंण्यात येते.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल