मुंबई : अलीकडेच पार पडलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला घवघवीत यश मिळाले त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेला आणि लाडकी बहीण योजनेला दिले आहे. त्याचप्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला आणि प्रतिध्रुवीकरणामुळेही घवघवीत यश मिळण्यास मदतच झाली, असेही फडणवीस यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमधून स्पष्ट केले. मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेमुळे जनतेच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ पाठोपाठ मोदी यांनी ‘एक है तौ सेफ है’ची घोषणा केली. त्याने जनमानसावरील पकड घट्ट केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ भारत अस्थिर करणाऱ्या शक्तींच्या आर्थिक मदतीवर आयोजित करण्यात आली होती, असा दावाही फडणवीस यांनी केला.
धर्मयुद्धाचे समर्थन
यावेळी फडणवीस यांनी आपल्या मतांसाठी केलेल्या धर्मयुद्धाचेही जोरदार समर्थन केले. इस्लामी विद्वानांनी महायुतीविरुद्ध व्होट-जिहादचे आवाहन केले होते, त्याला मतांसाठीच्या धर्मयुद्धाने प्रत्युत्तर देण्यात आले. एखादा व्होट-जिहादची भाषा करीत असेल तर आम्ही मतांसाठीचे धर्मयुद्ध पुकारणारच, असेही त्यांनी सांगितले.
हिंदुत्व आमच्या रक्तातच आहे, त्यासाठी पोस्टर बॉयची गरज नाही, हिंदू कधीही भेदभाव करीत नाहीत, मोदींनी विकास केला, भेदभाव केला नाही, योगी आदित्यनाथ यांची ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणा इंग्रजीत उत्तम वाटते. हिंदुत्व आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हिंदुत्व हा जीवनमार्ग आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीने इस्लामी विद्वान सज्जाद नोमानी यांच्याशी करार केला आणि मुस्लिमांविरुद्ध दंगलींचे गुन्हे मागे घेण्याचेही मान्य केले. काँग्रेसने हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. आमच्या विकासाच्या योजना आणि हिंदुत्वाने काम केले, असेही ते म्हणाले.
ईव्हीएमवर शंका उपस्थित करणआऱ्या विरोधकांचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. जेव्हा त्यांचा विजय होतो तेव्हा ते ईव्हीएमविरुद्ध बोलत नाहीत, मात्र पराभव होतो तेव्हा ते ईव्हीएमविरुद्ध गळा काढतात, असेही ते म्हणाले.
नदीजोड, ग्रीन एनर्जी
महाराष्ट्र आता थांबणार नाही याचा अर्थ अडीच वर्षापूर्वी आमचे सरकार आले तेव्हा आम्ही राज्याला ट्रॅकवर आणले. येत्या काळात आपला भर हा नदीजोड प्रकल्प आणि ग्रीन एनर्जीवर असणार आहे, असे फडणवीस म्हणाले. आपण आता चार प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करु शकतात, असे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रीन एनर्जीवर देखील माझा भर राहणार आहे. २०३० मध्ये ५२ टक्के वीज ग्रीन एनर्जी असेल, असेही फडणवीस म्हणाले. याचा शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. यामुळे रोजगाराची निर्मिती होईल, अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल.
धारावी प्रकल्प
धारावीची संकल्पना राजीव गांधीच्या काळात मांडली होती. यावर कोणत्याच सरकारने काहीच केले नाही. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा जीपीआर तयार केला. हा प्रकल्प करायचा असेल तर जास्त जागा लागणार म्हणून आम्ही रेल्वेकडून जागा विकत घेतली, त्याच्या निविदा काढल्या, विकासकही नियुक्त केला होता, त्यावेळी विकासक हे गौतम अदानी नव्हते. मात्र, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांनी निविदा रद्द केल्या. आता नवीन निविदा तयार केल्या आहेत, त्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने तयार केल्या आहेत. यातील एकच गोष्टी बदलली आहे ती म्हणजे टीडीआरचे कॅपिंग करा हे सांगितले. बाजारपेठ दराच्या ९० टक्के किंमत करता येईल, त्यापेक्षा जास्त किंमत करता येणार नाही. त्याचा डिजीटल प्लॅटफॉर्म असेल हेदेखील सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. नियमात बसणाऱ्यांना धारावीतच घर देणार, जे नियमात बसत नाहीत, त्यांच्यासाठी रेंटल हाऊसिंग करायचे ठरले असून १० ते १२ वर्षानंतर थोडे पैसे भरले की ते घर त्यांना मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.
कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
विधिमंडळाच्या हंगामी अधिवेशनासाठी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी शुक्रवारी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राजभवनात शुक्रवारी पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी कोळंबकर यांना अध्यक्षपदाच्या गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या. आजपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसाच्या विशेष अधिवेशनामध्ये कालिदास कोळंबकर विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.
११ किंवा १२ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे अर्थ खाते, भाजपकडे गृह खाते कायम राहणार असून शिवसेना शिंदे गटाला नगरविकास खाते तसेच महसूल खाते मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्री मंत्रिमंडळात असतील. भाजपला २१, शिवसेना शिंदे गट १२ आणि अजित पवार गटाला १० मंत्रिपदे मिळतील, असे समजते. ९ डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.
काँग्रेसने अद्याप गटनेताच निवडला नाही
नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसने अद्याप आपला गटनेताच निवडलेला नाही. परिणामी, उद्या शनिवारपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होत असले तरी विधानसभेत काँग्रेस नेत्याविनाच सामोरी जाणार आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक अलीकडेच मुंबईत पार पडली. मात्र, या बैठकीत गटनेता निवडला गेला नाही. ही निवड करण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना बहाल करणारा ठराव मात्र या बैठकीत संमत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आता नेतानिवडीची घोषणा अपेक्षित असून ती लगेच होईल, अशी अपेक्षा खुद्द काँग्रेसजनांनाही वाटत नाही.