वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सामील होण्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. शिवसेना ठाकरे गटाने मात्र वंचितला सोबत घेण्याचे ठरवले आहे. असे असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. महाविकास आघाडीकडून आज होणाऱ्या बैठकीला आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आता आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुस्लिम समाजाविषयी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत यावे अशी ऑफर त्यांनी शिंदे यांना दिली आहे. तसेच, मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये, असे आवाहनही आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला केले.
एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत यावे-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत यावे, मात्र, त्यासाठी आमची एक अट आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी आणि मग आमच्यासोबत यावे. असे आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आहेत. आता शिंदे यांनी याचचे का नाही हे ठरवावे, असेही त्यांनी म्हटले. ते वाशिम येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुस्लिमांनो काँग्रेस सोबत जाऊ नका-
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम मतदारांना काँग्रेससोबत न जाण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेसने आपल्याला हे दिले ते दिले म्हणून त्यांच्यासोबत जाऊ नये. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली, तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे आंबेडकर म्हणाले. तसेच, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. पण त्यांच्यात जागावाटपावरून अद्याप एकमत झाले नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.
...तर त्यांची अवस्था इंडिया आघाडी सारखी होईल-
महाविकास आघाडीने येत्या 15 दिवसांत जागावाटपाबाबत निर्णय न घेतल्यास त्यांची अवस्थाही इंडिया आघाडी सारखी होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इंडिया आघाडी तयार झाली होती. मात्र, जेव्हा ती अस्तित्वात आली तेव्हाच ती फुटणार असल्याचे निश्चित होते, असेही आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, आज होत असलेल्या महाविकास आघाडीच्या होत असलेल्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यापूर्चीच प्रकाश आंबेडकर यांनी अशी वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीवर दबाव तर टाकला जात नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.