महाराष्ट्र

Satara : पोलीस उपनिरीक्षकाच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिली सुसाइड नोट

शुक्रवारी सकाळी फलटणमधील हॉटेलमध्ये त्या महिला डॉक्टर राहत असलेल्या रूमचा दरवाजा वारंवार ठोठावूनही न उघडल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ फलटण शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, महिला डॉक्टरने गळफास घेतल्याचे आढळले.

Swapnil S

कराड : फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फलटण येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून ज्याने चार वेळा माझावर बलात्कार केला तसेच बदने याचा साथीदार प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला’ अशी सुसाईड नोट लिहून ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ संपदा मुंडे (सध्या रा. फलटण, मूळ रा. बीड) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे.

फलटण येथील नामांकित हॉटेलमध्ये बंद खोलीत सदर महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले असून संबंधित महिला डॉक्टर फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. शुक्रवारी सकाळी फलटणमधील संबंधित हॉटेलमध्ये त्या राहत असलेल्या रूमचा दरवाजा हॉटेल कर्मचाऱ्यांनी वारंवार ठोठावला असता तो उघडला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी फलटण शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून तो उघडून पाहिल्यानंतर महिला डॉक्टरने गळफास घेतल्याचे आढळून आले. फलटण शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर तो त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान महिला डॉक्टर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मुंडे यांना वारंवार शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा दबाव आणत होता, जर असा त्रास झाला तर मी आत्महत्या करेन असेही त्या घरच्यांना सांगत होत्या. इतकेच काय याबाबत त्यांनी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रार दिली होती. सदर तक्रार संबंधी चौकशी सुरू होती. मात्र त्या आधीच त्यांनी मानसिक व शारीरिक छळास कंटाळून आत्महत्या केली.

सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सखोल तपास केला जाईल असे त्यांनी सांगितले. हातावरील मजकूर हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. याबाबतचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून फलटण शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आत्महत्येप्रकरणी संबंधित जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यातच येत्या २६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर येत आहेत.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वित छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी आहे. गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा.
हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "हातावर वेदना...

ऐन दिवाळीत मुलाचा अपघाती मृत्यू; पण पालकांचा उदात्त निर्णय; सत्यम दुबे ठरला वसईतील सर्वात तरुण अवयवदाता!

बापच बनला हैवान! बुलढाण्यात जुळ्या मुलींची पित्याने केली हत्या, पत्नीचा राग चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलिस कोठडी

फलटण : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी प्रशांत बनकर अटकेत, पोलिस उपनिरीक्षक अजूनही फरार