महाराष्ट्र

५००० एसटी बसेससाठी घेतला 'हा' निर्णय, महामंडळाचे २३४ कोटी वाचणार; किफायतशीर व पर्यावरणपूरक सेवा मिळणार

महामंडळाची दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होणार आहे. एसटीच्या प्रवाशांना किफायतशीर व पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Swapnil S

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर होणार आहे. त्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात १० टक्के घट होण्यास मदत होणार आहे. तसेच महामंडळाची दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होणार आहे. एसटीच्या प्रवाशांना किफायतशीर व पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, किंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (भांडार व खरेदी) वैभव वाकोडे, महाव्यवस्थापक (यंत्र) नंदकुमार कोलारकर उपस्थित होते.

एकूण पाच हजार डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांमध्ये रूपांतरण हे तीन वर्षामध्ये एकूण ६ टप्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण ५ हजार बसेसचे रूपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाची सुमारे २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईल, असे जैन यांनी सांगितले. राज्यातील ९० आगारांत एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे डिझेल इंधनावर चालणारी सुमारे १६ हजार प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च डिझेलवर होतो. हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्स गॅस प्रा. लि. यांचेबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये परिवहनासाठी एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक