महाराष्ट्र

कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात दिवसाढवळ्या हत्या; पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला

Swapnil S

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी कोथरूड परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शरद मोहोळचा शुक्रवारी लग्नाचा वाढदिवस होता. तो मंदिरात चालला होता. त्यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. रुग्णालय परिसरात त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. पूर्ववैमनस्यातून मोहोळची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या शरद मोहोळ याने मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम सुरू केल्याने त्याच्या राजकीय पुनर्वसनची चर्चा सुरू झाली होती. शरद मोहोळ हा पुण्याच्या कोथरूड परिसरातील कुख्यात गुन्हेगार आहे.

मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली.

येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला होता. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र, बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरूच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.

गुंडांचा शासन बंदोबस्त करेल -फडणवीस

गुंड शरद मोहोळ याच्या हत्येवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, “या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. या कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही.”

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी