मुरूड-जंजिरा : ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. परंतु परतीचा पाऊस सुरू झाल्याने किल्ल्यामधील झाडीझुडपे साफ करण्याचे काम रखडले असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. सुमारे २२ एकर परिसरात विस्तीर्ण असलेला हा किल्ला खोल समुद्रात विसावलेला असून या किल्ल्यास २२ बुरूज आहेत. सदरचा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे ६ लाख पर्यटक येत असतात. सुरुवातीला २ ऑक्टोबर रोजी या किल्ल्याचे दरवाजे खुले होणार होते मात्र किल्ल्यातील साफसफाईचे काम पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा किल्ल्याचे दर्शन घेण्याचे लांबणीवर पडले. सध्या परतीचा पाऊस थांबल्याने तसेच साफसाफई देखील पूर्ण होण्याच्या मार्गवार असताना आता मुरूड-जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी ६ ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे.
मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात बंद केला जातो. मे महिन्याच्या अखेरीस हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. पावसाळी चार महिन्यांत किल्ल्याच्या आतील आजूबाजूला भिंतीवर व परिसरात मोठमोठी झाडे व गवत वाढल्याने या ठिकाणी सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असते. अशावेळी पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पुरातत्व विभागामार्फत पावसाच्या सुरुवातीलाच किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद केले जातात.
पर्यटकांसाठी किल्ल्याचे दरवाजे बंद केल्यानंतर त्याच्या साफसफाईला सुरुवात केली जाते. यंदाच्या मोसमात १३ सप्टेंबरला किल्ल्याच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली होती. परंतु जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे साफसफाईच्या कामाला अडथळा येत असल्याने किल्लाचे दरवाजे उघडण्यात तारीख पे तारीख पडत आहे.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून किल्लाचे दरवाजे उघडण्यात येणार होते. परंतु गेले चारपाच दिवस जोरदार वारा व पाऊस असल्यामुळे साफसफाईच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता. साफसफाईचे काम पूर्णपणे थांबविण्यात आले होते, त्यामुळे किल्ला खुला होण्याचे दिवस पुढे ढकलावे लागले होते. परंतु आता वातावरण चांगले असल्याने किल्ल्याच्या सफाईसफाईला चांगलाच वेग आला आहे. २१ कामगारांबरोबर आमच्या कार्यालयातील बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुंगरे हे स्वतः साफसफाई करत आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला पर्यटकांसाठी किल्ल्याचे दरवाजे नक्की उघडण्यात येतील. - बजरंग येलीकर, सहाय्यक अधिकारी संवर्धक पुरातत्व विभाग