धुळ्याजवळ भीषण अपघात; ६ ठार 
महाराष्ट्र

धुळ्याजवळ भीषण अपघात; ६ ठार

मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळ्याजवळच्या लळींग घाट परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आणि थरकाप उडवणारा तिहेरी अपघात घडला आहे.

Swapnil S

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळ्याजवळच्या लळींग घाट परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आणि थरकाप उडवणारा तिहेरी अपघात घडला आहे. रेतीचा डंपर, ट्रक आणि एक खासगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात झालेल्या या विचित्र अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तब्बल २६ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास लळींग घाटात आधी रेतीने भरलेला डंपर आणि एका ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग पथक आणि महामार्गावरील टोल कर्मचारी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धावून आले.

मदतकार्य सुरू असतानाच धडक

हे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनांमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे मदतकार्य करत होते. हे मदतकार्य सुरू असतानाच, मागून येणाऱ्या एका भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने नियंत्रण सुटल्यामुळे घटनास्थळावरील ट्रक आणि डंपरला अत्यंत भीषण धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हल्सच्या केबिनमध्ये बसलेले काही प्रवासी आणि तिथे मदत करत असलेला टोल कर्मचारी चिरडला गेला. या अपघातामुळे ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या सहकारी कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने टोल कर्मचारी घटनास्थळी अत्यंत आक्रमक झाले होते.

जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

या भीषण अपघातातील २६ जखमींना स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ धाव घेत वाहतूक पुन्हा सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, धुळे पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सोने-चांदी बाजारात मोठी घडामोड? अमेरिकी रोजगार आकडेवारी, इराणमधील तणावाचा परिणाम जाणवणार

Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

CJP Protest : ५ सप्टेंबरच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कायद्याचे पालन करण्याचे निर्देश

Nepal Floods : महापुरात गावं वाहून गेली, तरी 'ते' घर तग धरून उभं! काय आहे यामागचं रहस्य?

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत