नाशिक : नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून तिढा कायम असल्यामुळे यंदाच्या १५ ऑगस्ट रोजी येथे ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळतो याबाबत उत्सुकता होती. आता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना आणि रायगडमध्ये अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे.
चालू वर्षाच्या प्रारंभी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली होती. त्यामध्ये नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, संख्याबळ आणि गत अनुभव या निकषांवर महाजन यांच्या नियुक्तीवर अनुक्रमे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने महायुतीत अधिक तणाव निर्माण होवू नये म्हणून महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती. तर, रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेना आमदारांची संख्या जास्त असल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा पालकमंत्रिपदावर दावा आहे. त्यामुळे भरत गोगावले यांच्या हस्ते येथील झेंडावंदन व्हावे अशी शिंदे गटाची इच्छा होती. मात्र हा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना देण्यात आला आहे.
दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदरी निराशा पडल्यामुळे आता राज्यात यावरून पुन्हा महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.