मुंबई : वाढवण बंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी वाढवण बंदर येथील १२०० एकर जागेची चाचपणी करण्याचे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. कृषी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यासाठी दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मंत्री रावल यांनी नुकताच पॅरिस आणि एम्स्टर डॅम येथे दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तेथील बाजारपेठची माहिती घेतली होती.
पॅरिसच्या रुंगीश बाजारपेठेत एकाच ठिकाणी सर्व प्रकारचा शेतमाल येतो. फळ-फुलांसह सर्व धान्यांचा समावेश असतो. शेती, बागायती सर्व प्रतवारीनुसार येथे फळ-फुलांचे वर्गीकरण केले जाते. याच धर्तीवर राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा विचार आहे. सुमारे बाराशे एकर जमिनीवर ही आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्ययावत बाजारपेठ उभारली जाईल. फळ बाग, भातशेती, फुलांचे वर्गीकरण करून दर्जेदार उत्पन्न देणे, त्याचे योग्य प्रकारे पॅकिंग करून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर तातडीने पाठवणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ संदर्भात राज्य सरकार या दृष्टीने अत्यंत सकारात्मक विचार आहे. महामुंबई परिसरात ही बाजारपेठ असावी, हा हेतू आहे. वाढवण बंदर जवळ अथवा सिडकोच्या परिसरात सुमारे बाराशे एकर जमिनीवर महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ तयार करण्यात येणार आहे.
पॅरिसच्या रुंगीश बाजारपेठेचे वेगळेपण आहे. या बाजारपेठेत सर्व प्रकारचा शेत माल, धान्य, फळे, फुले यांचा समावेश
असतो. शेती, बागायती सर्व प्रतवारीनुसार येथे फळ-फुलांचे वर्गीकरण केले जाते. पॅरिसच्या रुंगीश बाजारपेठेच्या धर्तीवर राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा विचार असल्याचे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले.
बाजार अधिक सक्षम होतील!
राज्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, त्यांना योग्य भावही मिळेल. आपले बाजार अधिक सक्षम आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्तेनुसार दर्जेदार होतील यासाठी, सरकारचा प्रयत्न असेल, अशी माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.