उरी सेक्टरमधील स्फोटात कराडचे जवान अर्जुन जाधव शहीद; १५ जूनला सुट्टीवर येणार होते, २५ जूनला होता मुलाचा पहिला वाढदिवस 
महाराष्ट्र

उरी सेक्टरमधील स्फोटात कराडचे जवान अर्जुन जाधव शहीद; १५ जूनला सुट्टीवर येणार होते, २५ जूनला होता मुलाचा पहिला वाढदिवस

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण हँड ग्रेनेड स्फोटात कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र जवान अर्जुन राजेंद्र जाधव (३०) यांना वीरमरण आले.

Swapnil S

कराड : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण हँड ग्रेनेड स्फोटात कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र जवान अर्जुन राजेंद्र जाधव (३०) यांना वीरमरण आले. या दुर्दैवी घटनेमुळे शहापूर गावासह संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मंगळवारी सायंकाळी उरी येथील कमलकोट परिसरात गस्त घालत असताना हा स्फोट झाला. या दुर्घटनेत अर्जुन जाधव यांच्यासह ऐरोली (नवी मुंबई) येथील जवान विक्रम चव्हाण हे देखील शहीद झाले.

अर्जुन जाधव हे भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान होते. गेल्या नऊ वर्षांपासून ते देशसेवेत कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती काश्मीरमधील ८ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) युनिटमध्ये होती. स्फोटानंतर लष्कराच्या सहकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य राबवून दोन्ही जवानांना श्रीनगर येथील बदामीबाग लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा तपास लष्कराकडून सुरू आहे.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद अर्जुन जाधव यांचे पार्थिव लष्करी इतमामात मुंबईत आणण्यात आले असून शुक्रवारी सकाळी ते त्यांच्या मूळ गावी शहापूर येथे दाखल होणार आहे. त्यानंतर संपूर्ण शासकीय आणि लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तहसीलदार कल्पना ढवळे यांनी शहापूर येथे जाऊन शहीद जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. अर्जुन जाधव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, अकरा महिन्यांचा मुलगा, दोन बहिणी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेला धाकटा भाऊ असा परिवार आहे.

गृहिणी म्हणजे ‘राष्ट्रनिर्मात्या’; त्यांच्या योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३० हजार रुपये, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Mumbai : मृत भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांशी संपर्क नाही; ‘फॉर्वर्ड सीमेन्स युनियन’ची माहिती

सर्वात दुःखदायक प्रसंग; अहमदाबाद विमान अपघात, गुजरातचे पोलीस महासंचालक ज्ञानेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

पुणे-मिरज रेल्वे मार्गावर २१ दिवसांचा मेगाब्लॉक; दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

संत्रा निर्यातीवरील अनुदान राज्य सरकारकडून रद्द