खरात तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार; कोठडी बुधवारपर्यंत वाढवली 
महाराष्ट्र

खरात तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार; कोठडी बुधवारपर्यंत वाढवली

भोंदूबाबा अशोक खरात हा तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार पोलिसांनी केल्यामुळे त्याची कोठडी बुधवारपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Swapnil S

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात हा तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार पोलिसांनी केल्यामुळे त्याची कोठडी बुधवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. खरातच्या कोठडीची मुदत संपत असल्याने रविवारी नाशिक जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी पार पडली.

आरोपी खरातच्या मोबाईलमधील अनेक गोष्टी कोडवर्डमध्ये असून या कोडवर्डचा उलगडा करण्यासाठी आणि त्याला समोर बसवून चौकशी करण्यासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असे तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. खरात महिलांना काही विशिष्ट पाणी किंवा द्रव्य देत होता, त्यामागील सत्य शोधणे गरजेचे आहे, असे सरकारी वकील म्हणाले. याबाबत खरात तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार सरकार पक्षातर्फे करण्यात आली.

खरात याच्या राजकीय कनेक्शनचाही आज उल्लेख झाला. त्याच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर केला जात असून, त्याने काही राजकीय व्यक्तींची नावे सांकेतिक नावाने सेव्ह केल्याचा संशय पोलिसांना आहे.

सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायमूर्तींनी काही तक्रार आहे का, असा प्रश्न खरातला केला. त्यावर खरातने केवळ एका शब्दात 'नाही' असे उत्तर दिले.

दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता एक एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.

कोठडी का वाढवली?

  • खरातचे तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही.

  • त्याच्या मोबाईल डेटाबाबत समक्ष चौकशी करायची आहे.

  • आपल्याकडे आलेल्या महिलांना खरात पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता. ते खाल्ल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होत त्यांचे डोके जड व्हायचे. यानंतर अशोक खरात सांगायचा तसे या महिला करत होत्या, हे नेमकं काय आहे, याचा तपास करायचा आहे. आरोपी अशोक खरात याबद्दल कोणतीही माहिती देत नाही.

  • खरातने किती आणि कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली, याचा तपास करायचा आहे.

  • अशोक खरात याने जे कृत्य केले त्यात त्याला कोणी मदत केली आहे का? याचा तपास करायचा असल्याने वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

  • महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण मोठे आहे. तपास प्राथमिक अवस्थेत आहे. आरोपीकडून गुन्ह्याची माहिती घेऊन डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर पीडित महिलांची माहिती येणे बाकी आहे. या कारणास्तव आरोपी अशोक खरातला वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

चाकणकर यांना समन्स?

नाशिक - भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून विशेष तपास पथकाकडून त्यांना समन्स काढले जाणार असल्याचे समजते. दरम्यान, या संदर्भात नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले असता याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. अशा प्रकरणांमध्ये रोजच्या रोज बारीकसारीक गोष्टींची माहिती घेतली जात नसते, असे त्यांनी स्पष्ट केले. चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आधीच दिला होता. शनिवारी त्यांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे प्रमुखपदही सोडावे लागले होते.

Mumbai : २३,००० पाणथळ जागांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण; कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार

Mumbai : डिसेंबरपर्यंत ग्रीन बाँड बाजारात; मोठ्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी BMC चा निर्णय