मुंबई : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळताना व्हिडीओ वायरल झाला आणि ते विरोधकांच्या रडारवर आले आहेत. मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असे संकेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, मंत्री कोकाटे यांसह मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम हेही निशाण्यावर असून त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे.
शेतकऱ्यांना कर्ज दिले तर लग्न व साखरपुड्यात खर्च करतात, असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना केले होते. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात चक्क मोबाइलवर ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुलाला महागडे हॉटेल दिल्याचे प्रकरण, त्यानंतर घरात पैशांनी भरलेल्या बॅगचा व्हिडीओ व्हायरल झाला, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवलीत डान्स बार असल्याचा मुद्दा विधान परिषदेपासून आजही गाजत आहे. या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असून या तिन्ही मंत्र्यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचे कृषीमंत्री विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतात हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार व पदाधिकारी गुंड, मवाली बनलेत. परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या माजलेल्या लोकांना वेसन घालू शकत नाहीत. कारवाई फक्त विरोधी पक्षांवर करणाऱ्यांनी कृषीमंत्री व गुंडगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची धमक दाखवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
तीन मंत्र्यांची हकालपट्टी करा - अंजली दमानिया
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महायुतीतील तीन मंत्र्यांची हकालपट्टी करा, अशी पोस्ट एक्सवर केली आहे. मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह आमदार संजय गायकवाड यांना बडतर्फ करण्याची मागणी करत याविरोधात लढा उभारण्याची घोषणाही करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार असून अनेक मुद्द्यासह सूरज चव्हाण यांच्या तातडीने अटकेची मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.