महाराष्ट्रातील एनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारित 'महा हब' ठाणे जिल्ह्यात साकरण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रायलयात या विषयीची बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या अंतार्ली गावात हे 'महा हब' साकारण्यात येणार आहे. हे 'महा हब' साकारण्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून त्याला तत्वत: मंजूरी देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
येणाऱ्या काळात राज्यातील स्टार्टअपच्या संख्येत वाढ व्हावी. तसंच उद्योगांना एका छताखाली स्टार्ट अप आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसह पोषक वातावरण मिळावं ही या 'महा हब'ची प्रमुख संपल्पना आहे. यासाठी उद्योग विभाग, कौशल्य विभाग, रोजगार उद्योजगता व नावीन्यता विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग तसंच इतर विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. यावेळी ठाणे, कल्याण या परिसरात मजबूत उद्योजकीय इको सिस्टीम तयार करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव पराग जैन-नानौटिया, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्यासह 'महा हब'चे अधिकारी उपस्थित होते.