संग्रहित छायाचित्र एएनआय
महाराष्ट्र

अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

शरद पवारांच्या पक्षाचा कोण उमेदवार असणार याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे. युगेंद्र पवार बारामतीत राजकीयदृष्ट्या सक्रिय झाल्यामुळे काका विरुद्ध पुतण्या अशी लढत तिथे होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती सोडून इतर मतदारसंघांतून चाचपणी करत असल्याच्या चर्चा होत्या. पण अखेर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल यांनी अजित पवार हे बारामतीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृतपणे सांगतो की, अजित पवारच बारामतीतून पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील. ही मी पहिली जागा जाहीर करतो.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत फारशी कामगिरी दाखवता आली नाही. पक्षाला चारपैकी एकच खासदार निवडून आणता आला. अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यातही बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना अधिक मताधिक्य मिळाले. आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवताना स्वतः अजित पवारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार मतदारसंघाच्या शोधात असल्याच्या चर्चा होत्या. अजित पवार हे हडपसर, शिरूर या मतदारसंघात चाचपणी करत असल्याचेही बोलले जात होते.

बारामतीत पुन्हा काका-पुतण्यामध्ये संघर्ष

बारामतीमध्ये आपली बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला उभे करून आपण चूक केली. घरात राजकारण आणायला नको होते, असे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्याचबरोबर बारामतीतून निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे बारामतीतून अजित पवारांचे पुत्र जय पवारांचे नाव चर्चेत होते. पण आता अजित पवार हे महायुतीचे बारामतीचे उमेदवार असतील, तर शरद पवारांच्या पक्षाचा कोण उमेदवार असणार याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे. युगेंद्र पवार बारामतीत राजकीयदृष्ट्या सक्रिय झाल्यामुळे काका विरुद्ध पुतण्या अशी लढत तिथे होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बारामतीत सख्या काका-पुतण्याची लढत अतिशय अटीतटीची होईल यात शंकाच नाही.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या