पुणे: राज्यात पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या संपूर्ण राज्यावर शंभर टक्के दुष्काळाचे सावट पसरले असून, पाण्यावाचून शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञान उपलब्ध असेल, तर शासन कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा नक्कीच सकारात्मक विचार करेल असे त्यांनी सांगितले.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी व शासनाची भूमिका
कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की, सर्व आमदार आपापल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने ही मागणी अजिबात चुकीची नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यभरातून पाऊस आणि पीक परिस्थितीचा सविस्तर अहवाल मागवण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत हा अहवाल हातात आल्यानंतर राज्य सरकार यावर योग्य तो निर्णय घेईल. कृत्रिम पावसाच्या (क्लाउड सीडिंग) पर्यायाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वेळेचे कृत्रिम पावसाचे अनुभव फारसे चांगले नव्हते, परंतु जर आता नवीन तंत्रज्ञान उपलब्ध असेल, तर शासन या प्रयोगाचा नक्कीच सकारात्मक विचार करेल.
कर्जमाफी आणि महिला शेतकरी कायदा
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असून यासाठी शासनाने ४० हजार ५८५ कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. तसेच, नुकत्याच आणलेल्या महिला शेतकरी कायद्यामुळे आता महिलांकडे शेतकरी असल्याचे वैध प्रमाणपत्र असल्यास बँका किंवा इतर ठिकाणी जमिनीच्या कागदपत्रांसाठी पतीच्या सहमतीची वा कागदपत्रांची गरज भासणार नाही आणि त्यांना सर्व शासकीय योजनांचा थेट लाभ सहज मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पावसाचा खंड आणि पिकांचे नुकसान
यंदाच्या पावसाळ्याच्या स्थितीवर प्रकाश टाकताना कृषिमंत्र्यांनी सांगितले की, जून महिन्यात पाऊस पडला नाही आणि जुलैमध्ये काही प्रमाणात हजेरी लागली, परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने खूप मोठा खंड दिला. पुणे, कोकण आणि ठाणे परिसराचा काही भाग वगळता मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि उत्तर महाराष्ट्रात अत्यंत तुटपुंजा पाऊस झाला आहे. या लहरी हवामानामुळे शेतकरी अत्यंत बिकट अडचणीत सापडले असून त्यांनी कष्टाने केलेली पेरणी, विशेषतः कापूस आणि सोयाबीनची पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या स्थितीत पोहोचली आहेत. या भीषण दुष्काळी परिस्थितीचे पडसाद यंदाच्या बैलपोळ्याच्या सणावरही स्पष्टपणे जाणवले असून, शेतकरी वर्ग नाराज आणि चिंतेत असतानाही वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची पूजा करणे आपले कर्तव्य मानून शेतकर्यांनी हा सण अत्यंत साधेपणाने साजरा केला.