मुंबई : नगर परिषद नगरपंचायत निवडणुकी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत तब्बल दीड कोटींहून अधिकची रोख रक्कम जप्त केली. तर आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी गोपनीयताचा भंग केल्याप्रकरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. संतोष बांगर प्रकरणात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
नगर परिषद व नगरपंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उडाली. यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आचार संहितेचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्थानिक पातळीवरील अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत मतदान केंद्रात मोबाईलचा वापर, घोषणाबाजी आणि एका महिलेला मतदानासाठी मार्गदर्शन करून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेत घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आयोगाने या प्रकारावर कठोर भूमिका घेत बांगर यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.
निवडणुका घेण्याचा पर्याय निवडणार!
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपूर्वी निवडणुका घ्यायच्या आहेत. २४६ नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका झाल्या असून, उर्वरित २४ नगरपरिषदेच्या निवडणुका २० डिसेंबरला होणार आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि २९ महापालिका निवडणुका घेण्याची आयोगाकडून तयारी सुरू आहे. या निवडणुकांचे नियोजन कसे करण्यात यावे. या एकत्रित घ्यायच्या की टप्प्याटप्याने अथवा प्रथम महापालिका निवडणुका घ्यायच्या या पर्यायांचाही आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.
महापालिका आयुक्तांची आज बैठक
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मतदार यादीतील दुबार नावांचा प्रश्न विरोधकांनी उचलून धरला आहे. मतदार यादी स्वच्छत करूनच निवडणुका घ्याव्यात, अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. त्या विरोधात महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता. पक्षांनी यावर आक्रमक भूमिका घेत मतदार याद्यांतील त्रुटीवर तीव्र आक्षेप नोंदवले. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने मतदार यादीत दुबार नावापुढे दोन स्टार अशी खूण केली आहे. तसेच त्यांच्याशी संपर्क साधून कुठे मतदान करणार याची माहिती घेत हमी पत्र लिहून घेतले जात आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांची उद्या गुरुवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत दुबार नावांचा आढावा निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले..