मुंबई : महाराष्ट्र आता केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाचे केंद्र बनत आहे, आणि भविष्यातील उद्योग आणि नाविन्यतेसाठी राज्य तयार होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाढवण बंदराभोवती चौथी मुंबई विकसीत केली जात आहे, असेही ते म्हणाले. हॉटेल ताज पॅलेस येथे बँक ऑफ अमेरिकातर्फे आयोजित ' २०२५ इंडिया कॉन्फरन्समध्ये : एक्सेलेटरिंग ग्रोथ, महाराष्ट्रा @वन ट्रिलीयन' या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
‘मेक इन इंडिया” या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे. तसेच नुकतेच यशस्वी झालेले “ऑपरेशन सिंदूर” ने भारतीय संरक्षण उत्पादनक्षमता किती प्रगत झाली आहे, हे दाखवून दिले आहे. उत्तर प्रदेश व तमिळनाडूमध्ये संरक्षण उद्योगाचे क्लस्टर्स असले तरी खऱ्या अर्थाने भारतातील संरक्षण उत्पादनाचे केंद्र महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात मोठी घोडदौड केली असून, राज्य आज मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादनाचा केंद्रबिंदू ठरत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
देशातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आता महाराष्ट्रात आहे. मुंबई ही आधीच देशाची प्रमुख ‘फिनटेक’ राजधानी झाली आहे, तसेच महाराष्ट्र हे स्टार्टअपसाठी देखील एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संधींबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगभरातील गुंतवणूकदार आता सुरक्षित पर्याय शोधत आहेत, जे जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, आणि भारत या संधीसाठी सर्वात योग्य स्थानावर आहे. महाराष्ट्र शासन या संधीसाठी पूर्णतः सज्ज आहे.
कृती आराखडा: महाराष्ट्र २०२९
राज्याच्या गतीमान प्रशासनामुळे विविध उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शंभर दिवसाच्या कार्यक्रमातंर्गत अतिशय चांगली अंमलबजावणी सर्व प्रशासकीय विभागांनी केली असून सध्या प्रशासनासाठी १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक विभागाने ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दीर्घकालीन ध्येयासाठी आपापल्या विभागांची उद्दिष्टे, कृती आराखडा तयार करायचे आहेत. या योजनेत तीन टप्पे असून त्यात दीर्घकालीन दृष्टिकोन: महाराष्ट्र २०४७ तसेच मध्यम कालावधीचा आराखडा: महाराष्ट्र २०३५ आणि तत्काल कृती आराखडा: महाराष्ट्र २०२९ या तीन टप्प्यांचा समावेश असेल. या सर्व टप्प्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असून त्याचा प्रशासनावर आणि उद्योगांवर होणारा परिणाम, आणि नवीन गुंतवणुकीच्या संधी यांचा विचार केला जात, असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
वाढवणला नवीन विमानतळ
चौथी मुंबई’ ही संकल्पना वाढवण बंदराभोवती विकसित केली जात आहे. येथे भारतातील सर्वात मोठे बंदर आणि नवीन विमानतळ उभारले जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळाला मंजुरी दिली असून त्याचे पुढील सर्वेक्षण सुरू आहे. तसेच बुलेट ट्रेन, आणि कोस्टल रोड वाढवणपर्यंत नेण्याचीही योजना असल्याने हा भाग एक मोठं शहरी केंद्र बनेल, असे फडणवीस म्हणाले.
१६ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक!
दावोस आर्थिक परिषदेदरम्यान महाराष्ट्राने १६ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. यापैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक उत्पादन क्षेत्रात आहे, हे लक्षवेधी असून ‘मेक इन इंडिया’चा प्रत्यक्ष परिणाम राज्यात दिसून येत आहे. उत्पादन व औद्योगिक विकास हेच राज्याच्या प्रगतीचे केंद्रबिंदू असून, “मेक इन इंडिया” योजनेमुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.