अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रभरात गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असताना अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या. पुणे, नांदेड आणि मुंबईत पाण्यात बुडणे व विजेचा धक्का लागणे अशा अपघातांत ७ जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आनंदाच्या वातावरणावर शोककळा पसरली आहे.
पुण्यात विसर्जनावेळी चौघांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात विसर्जनावेळी चार जणांचा मृत्यू झाला. वाकी खुर्द येथील भामा नदीत विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुण पाण्यात बुडाले. यातील एका तरुणाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
याशिवाय, बिरदवडी येथील एका विहिरीत एक व्यक्ती बुडाल्याचे समोर आले आहे. तर शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नांदेडमध्ये तिघे पाण्यात वाहून गेले
नांदेड जिल्ह्यातील गाडेगाव शिवाराजवळील आसना नदीत तिघे जण विसर्जनासाठी उतरले असता ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामधील एकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र बालाजी उबाळे आणि योगेश उबाळे हे दोघे बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक प्रयत्नशील आहे. शनिवारी (दि. ६) संध्याकाळी ही घटना घडली.
मुंबईत विजेचा धक्का लागून मृत्यू
मुंबईच्या साकीनाका परिसरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले. साकीनाका येथील खैराणी रोडवरील श्री गजानन मित्र मंडळाची मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीच्या ट्रॉलीला ११ हजार व्होल्टेजच्या हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाला.
या अपघातात बिनू शिवकुमार (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता (वय १८), धर्मराज गुप्ता (वय ४४), आरुष गुप्ता (वय १२), शंभू कामी (वय २०) आणि करण कानोजिया (वय १४) हे पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या सर्व घटनांमुळे बाप्पाच्या निरोपाच्या उत्सवावर शोककळा पसरली असून राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.