महाराष्ट्र

सीमावाद उफाळला; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून, ही ठिणगी आता नव्याने धुमसताना दिसत आहे. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये आजपासून सुरू होत असून या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी लागू केली आहे.

Swapnil S

बेळगाव : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून, ही ठिणगी आता नव्याने धुमसताना दिसत आहे. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये आजपासून सुरू होत असून या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी लागू केली आहे.

सोमवारी सकाळपासून या परिस्थितीला गंभीर वळण मिळत असल्याचे पाहायला मिळाले, बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या नजरकैदेत असल्याची वस्तुस्थिती बेळगावमधून समोर आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकर यांचा पोलिसांकडून पाठलाग केला जात असल्याचे पाहायला मिळाले. ते व्यायामासाठी बाहेर पडले असतानादेखील त्यांच्यामागे पोलिसांचा पाठलाग सुरूच असल्यामुळे मराठी भाषिकांपुढे असणारी आव्हाने पुन्हा एकदा समोर आली.

बेळगावमधील या महामेळाव्यासाठी कोल्हापूरमधून ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने बेळगावकडे जाणार आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी ठाकरे गटाचे नेते विजय दवणे यांच्यासह प्रमुख नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी केली असून, तशा नोटिसादेखील बजावण्यात आल्या. सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि नेते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी जात असतानाच तिथे कर्नाटक पोलिसांच्या तुकडीने या नेत्यांना रोखले. यावेळी आम्हाला अभिवादन करत हार अर्पण करण्यासाठी जाऊ द्या, अशी विनंती करूनही पोलिसांनी या विनवणीला न जुमानताच (पान १ वरून) त्यांना ताब्यात घेतले आणि गोंधळ माजला.

नेत्यांना धक्काबुक्की करत मराठी भाषकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतानाही ते दडपण्यासाठी केला जाणारा बळाचा वापर गैर असल्याच्या घोषणा आणि ठाम भूमिका मांडत नेत्यांनी आक्रोश केला. महाराजांच्या मूर्तीला हार घालण्यात चुकीचे काय, असा सवाल यावेळी या नेत्यांनी संतप्त स्वरात विचारला. सकाळपासूनच पोलिसांकडून नेत्यांची धरपकड सुरू असून, बेळगावमधील वातावरणाला तणावग्रस्त वळण मिळताना दिसत आहे.

बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा - आदित्य ठाकरे

कर्नाटकमधील बेळगाव येथे मराठी भाषकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केला आणि बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्याचा उत्सव साजरा करण्यात येत असताना शेजारच्या राज्यातील बेळगाव येथील स्थिती खालावत चालली आहे, असे ते म्हणाले.

सीमाप्रश्नावरून पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

भाजप सरकार असताना तुम्ही गप्प होते. आता तिथे काँग्रेसचे सरकार आहे म्हणून टीका करत आहेत. ‘मोदी है तो मुमकीन है’ म्हणता मग सीमावाद का सोडवत नाहीत? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

बेळगाव सीमाप्रश्न माझ्या जिव्हाळ्याचा - एकनाथ शिंदे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न माझ्या जिव्हाळ्याचा आहे. बेळगावच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी शिवसेना उभी असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषिकांचा मेळावा आयोजित केला होता. तो मेळावा होऊ नये, यासाठी कर्नाटक सरकारने पुरेपूर प्रयत्न केला. कर्नाटक सरकारने दडपशाही केली. याबद्दल कर्नाटक सरकारचा आम्ही धिक्कार करतो, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध केला.

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

जंजिरा किल्ला सप्टेंबर अखेरपर्यंत खुला? पुरातत्त्व खात्याच्या हालचाली सुरू; असंख्य पर्यटकांची प्रतीक्षा लवकरच संपणार

स्वच्छतेसाठी आंदोलक सरसावले; आझाद मैदान परिसरात पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पुढाकार