मुंबई : राज्यातील २६२ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आणि ६०४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी विजयाचा गुलाल उधळला जाणार होता. मात्र आता सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा महत्त्वाचा निकाल दिला आहे.
काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे मंगळवारी आणि २० डिसेंबर अशा दोन्ही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळेच बुधवारी होणारी मतमोजणी आता रद्द करण्यात आली आहे. २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
खंडपीठाच्या निर्णयानुसार, मंगळवारी मतदान झाले तरी सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी केली जाईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. तर २० डिसेंबर रोजी मतदानानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर केले जातील. ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली त्या ठिकाणच्या उमेदवारांना आत्ताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळाले होते, त्यांचे ते निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. मात्र, निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी जे खर्च केले आहे त्यांची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी, ही मागणी न्यायालयाकडून मान्य झालेली नाही.
देशात मनमानी सुरू आहे -राज ठाकरे
देशात मनमानी सुरू आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.
लोकशाहीसाठी घातक - सुप्रिया सुळे
निवडणुका पुढे का गेल्या माहित नाही. निवडणूक पूर्णपणे रद्द झाली पाहिजे. कारण या निवडणुकीत भरपूर घोळ आहे. हे सर्व एका सशक्त लोकशाहीसाठी हे सर्व अतिशय घातक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पहिल्यांदाच असे घडतेय - फडणवीस
हा निर्णय खंडपीठाने दिला आहे, तर तो सगळ्यांना मान्यच करावा लागेल. मी मागील २५ ते ३० वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आलो आहे. पण असे पहिल्यांदा घडत आहे की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. त्याचे निकाल पुढे चालले आहेत. ही जी काही पद्धत आहे, ती योग्य वाटत नाही. माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही, तर संपूर्ण प्रक्रियेत दिसलेल्या उणिवांवर आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.