मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या नुकत्याच पूर्ण झालेल्या तिसऱ्या फेरीमध्ये २१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर चौथ्या फेरीसाठी ३८७ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये सरकारी महाविद्यालयात ३७ तर खासगी महाविद्यालयामध्ये ३५० जागा रिक्त राहिल्या आहेत. या फेरीमध्ये प्रवेश नाकारलेले ३८७ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्याने चौथ्या फेरीसाठी ३८७ जागा रिक्त राहिल्या आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी ८ हजार १३८ जागा उपलब्ध होत्या. या फेरीत प्रवेश मिळालेल्या ६ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी १ हजार २९० जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र दुसऱ्या फेरीपूर्वी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगांतर्गत असलेल्या वैद्यकीय समुपदेशन समितीने राज्यामध्ये खासगी व सरकारी महाविद्यालयांतर्गत २०० जागांना मान्यता दिली. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी १ हजार ४९० जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आल्या. या फेरीनंतर तिसऱ्या फेरीसाठी ६०६ जागा रिक्त राहिल्या होत्या. सरकारी महाविद्यालयामध्ये १३८ तर खासगी महाविद्यालयामध्ये ४६८ जागा होत्या.
तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करण्यात आली होती. मात्र तिसऱ्या फेरीमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी २१९ जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सरकारी महाविद्यालयामध्ये १०१ तर खासगी महाविद्यालयांमध्ये ११८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
त्यामुळे चाैथ्या फेरीसाठी ३८७ जागा रिक्त आहेत. रिक्त राहिलेल्या जागांमध्ये सरकारी महाविद्यालयामध्ये ३७ तर खासगी महाविद्यालयामध्ये ३५० जागा रिक्त आहेत. तर प्रक्रियेच्या नियमानुसार तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश नाकारलेले ३८७ विद्यार्थी हे प्रवेश फेरीतून बाद होणार आहेत.
दंत अभ्यासक्रमाच्या ५०८ जागा रिक्त
दंत अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीमध्ये ३८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने ५०८ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये सरकारी महाविद्यालयामध्ये २६, तर खासगी महाविद्यालयामध्ये ४८२ जागा रिक्त आहेत.