मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधी झाले असून मे महिन्याच्या अखेरीस वरुणराजाने राज्यातील बहुतांश भागांना झोडपून काढले. मात्र त्यानंतर पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यात १४ जूनपर्यंत पावसाची विश्रांती असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मे २४ रोजी मान्सून केरळात दाखल झाला, त्यानंतर महाराष्ट्रात २५ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. २४ ते २७ मे दरम्यान पावसाने राज्यातील बहुतांश भागांना झोडपून काढले. चार ते पाच दिवस धुवांधार बरसलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने काढता पाय घेतला असून आता १५ जूननंतर पावसाचा पुन्हा एकदा कमबॅक होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र पावसाने ब्रेक घेतल्याने तापमानात वाढ झाली असून विशेषतः विदर्भ, मराठवाडा, आणि खान्देशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान ४० अंशापेक्षा अधिक असेल असा अंदाज आहे. मराठवाडा आणि खान्देशातील अनेक भागात कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे.
पेरणी व लागवडीची घाई नको
दरम्यान, कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.